सांगा… साहेब या रस्त्यावरुन जायचे कसे ?
हंगरगा पाटी ते सालेगाव रस्त्याची दैन्यावस्था
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव मतदारसंघात शेकडो कोटीची कामे करण्यात आली असल्याचा सत्ताधारी एकीकडे दावा करतात तर दुसरीकडे तब्बल पंचवीस वर्षांपासून हंगरगा पाटी ते सालेगावला जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी सुध्दा करण्यात आली नसल्याने या भागातील नागरिकांच्या गैरसोयीची कल्पनाच न केलेली बरी.
गावच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था अगोदरच्या राज्यकर्त्यांनी कुंटूर परिसराचा विकास केला नाही अशी ओरड विद्यमान सत्ताधाऱ्यांनी प्रचंड विकासाची कामे केली असून शेकडो कोटीचा निधी आणला असल्याचा दावा समर्थक करत आहेत. पण तब्बल पंचवीस वर्षापासून हंगरगा पाटी ते सालेगावला जाणाऱ्या रस्त्याचे नुतणीकरण तर सोडाच साधी डागडुजीही आजपर्यंत करण्यात आली नाही. त्यामुळे करण्यात येत असलेल्या दाव्याची काय सत्यता असेल हे एक न उलगडणार कोडच आहे.
नायगाव तालुक्यात जी कामे करण्यात आली त्या रस्त्याची अवस्था पाहील्यास अतिशय दयनीय आहे. अंदाजपत्रकात भरमसाठ तरतुदी ठेवायच्या आणि काम मात्र सुमार दर्जाचे कारायचा असा नवीन पँटर्न नायगाव तालुक्यात रुढ झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्त्याचा दर्जा टक्केवारीत आडकल्याचा नेहमी च आरोप होतो आणि रस्त्यांची दुर्दशा पाहता त्यात सत्यता असल्याचे दिसून येते.
कुंटूर पासून चार ते पाच किमी अंतर असलेल्या सालेगाव येथे जाण्यासाठी पंचवीस वर्षांपासून रस्त्यातच बनला नाही. तीन हजार लोकसंख्या असलेले नायगाव तालुक्यातील सालेगावच्या जनतेला तालुक्याला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. गावच्या बाहेर शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय न सांगण्यासारखीच आहे. कुंटूर ते दत्तनगर पर्यंत रस्ता बनलेला आहे. त्याच्यापुढे हंगरगा पाटी पासून सालेगाव, हुस्सा, डोंगरगाव, दुगाव ला जाण्यासाठी रस्ता अतिशय अवघड आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाऊस झाला खड्ड्यात पाणी भरते त्यामुळे अनेक वेळा अपघात झालेले आहेत.
सालेगावसह या भागातील नागरिकांनी अनेकवेळा रस्ता करण्यासाठी निवेदने दिली मात्र आजपर्यंत एकाही राजकारण्यांनी दखल घेतली नाही. याचा परिणाम त्या भागातील नागरिकांना भोगावा लागत आहे.