स्मशानभूमीत अतिक्रमण : ग्रामस्थांनी मृतदेह तहसीलच्या दारातच आणून ठेवला
तहसीलदारांनी थेट गावात जावून अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करुन दिली
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : स्मशानभूमीच्या जागेवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने अंत्यविधी करण्यासाठी जागाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे तालुक्यातील टाकळी बु. येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी चक्क मृतदेह तहसील कार्यालयाच्या दारातच आणून ठेवला. त्यामुळे महसूल प्रशासनाची तारांबळ उडाली मात्र तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी फौजफाट्यासह थेट गावात जावून अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने हक्काच्या स्मशानभूमीत सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
नायगाव तालुक्यातील टाकळी बु. येथे गट क्रमांक १३३ मध्ये ३ एकर जागेवर मातंग समाजाच्या स्मशानभूमी असल्याची नोंद आहे पण यावर गावातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या जागेची मोजणी करुन देण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसापासून तहसीलदार यांचेकडे करण्यात येत होती. मात्र तहसील कार्यालय व भुमिअभिलेख कार्यालयात कागदोपत्री खेळ चालू होता. दोन्ही कार्यालयाच्या या वेळखाऊ भुमिकेमुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी वांदे होत होते. त्यामुळे गणपती रेड्डी व राजेंद्र रेड्डी यांनी स्मशानभूमीच्या जागेसाठी पाठपुरावा सुरुच होता. तरीही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता.
शुक्रवारी सकाळी गावातील लक्ष्मण माणिक रेड्डी (७०) यांचे निधन झाले त्यामुळे अंत्यसंस्कार कुठे करावेत असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांना चक्क मृतदेह तहसील कार्यालयाच्या दारातच आणून ठेवला. त्यामुळे महसूल एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रसंगाने प्रशासनाची मोठी धावपळ झाली तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड या तत्काळ आल्या त्याचबरोबर नायगाव व रामतीर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी हजर झाले.
त्याचबरोबर भुमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारीही उपस्थित झाले. आम्हाला स्मशानभूमीची जागा मोजून दिल्याशिवाय मृतदेह हलवलणार नसल्याची भुमिका रेड्डी कुटूंबीयांनी घेतली. त्यामुळे तहसीलदारांनी मृतदेहाची अशा प्रकारे अवहेलना करु नका अशी विनंती केली आणि मी गावात येवून आजच जागा मोजून देतो असा विश्वास दिला. त्यामुळे तहसीलच्या दारातील मृतदेह वाहणात ठेवण्यात आला. तहसीलदार गायकवाड या फौजफाट्यासह टाकळी बु. येथे पोहचल्या आणि स्मशानभूमीच्या जागेची मोजणी सुरु केली.
दुपारपर्यंत मोजणी करुन रेड्डी कुटुंबातील मयत लक्ष्मण माणिक रेड्डी (७०) यांच्या अंत्यविधीसाठी हक्काची जागा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे कुठल्याही वादाविना सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
तहसीलदार, रामतीर्थचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप व भुमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यासह श्रीनिवास चव्हाण आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी समन्वयाची भुमिका घेतली त्यामुळे स्मशानभूमीचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ४५ मध्ये ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकार व कर्तव्य विषद केले आहेत. सदर अधिनियमाला जोडलेल्या अनुसची ‘एक’ मधील नोंद क्रमांक ३७ अन्वये ग्रामीण भागात दहण व दफन भुमीची तरतूद करणे त्या सुस्थितीत राखणे व त्यांचे विनिमय करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतवर सोपविण्यात आलेली आहे. मात्र एकही ग्रामपंचायत आपली जबाबदारी पार पाडत नाही.
खेड्यापाड्यात तर आजही स्मशानभूमी नाही. ज्या गावात जुनी व पारंपरिक स्मशानभूमी आहे तेथे कुणी ना कुणी अतिक्रमण केलेले आहे. काही ठिकाणी प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या जागा आहेत पण दलितांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेकवेळा वाद तंटा झालेलाच आहे. गोदमगाव आणि परडवाडी येथील प्रकरण संबंध जिल्ह्यात गाजलेले आहे.