गावाकडच्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

मे महिण्यात केलेल्या रस्त्याची जुलैमध्ये दुरावस्था : साहेब हाच का तुमचा विकास : व्हिडीओ व्हायरल करुन विचारला जाब

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : उमरी तालुक्यातील नागठाणा येथील ७०० मिटर रस्त्यासाठी एक कोटीचा खर्च करण्यात आला. मात्र तीनच महिण्यात या रस्त्याची अवकळा झाली. त्यामुळे नागठाणा येथील सरपंच प्रतिनिधी दिगांबरराव गायकवाड यांनी एक व्हिडिओ करुन त्यात झालेला भ्रष्टाचार तर चव्हाट्यावर आणलाच आहे पण आ. राजेश पवार यांना साहेब हाच तुमचा विकास असा प्रश्न विचारला आहे. प्रचंड व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे बोगस कामाची पोलखोल केली आहे.

नायगाव विधानसभा मतदारसंघात मागच्या दोन आडीच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बोगस कामे होत आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या रस्त्यांची अवघ्या तीन ते सहा महिण्यातच दुरावस्था होत आहे.

त्यामुळे दर्जेदार कामाच्या नावाखाली केवळ टक्केवारीच्या माध्यमातून बक्कळ रक्कम कमवण्याचा गोरखधंदा सुरु असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कुणीही कितीही ओरड केली तरी गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जाग येतांना दिसत नाही. विशेष म्हणजे कोणत्याही रस्त्यासाठी अंदाजपत्रक तयार करतांना अनेक तरतुदी ठेवण्यात येत आहेत पण काम करतांना संबधीत गुतेदार या तरतुदी गुंडाळून काम करत असल्याने अल्पावधीतच कोट्यवधी रुपयाच्या कामाचे तीन तेरा वाजत आहेत.

नायगाव विधानसभा मतदारसंघातील नागठाणा खु. ते नागठाणा बु.या गावच्या ७०० मिटर रस्ता कामासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. हे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून मंजूर झाले असून अंकुश पवार या गुतेदाराने काम केल्यचा सदरच्या व्हिडीओमध्ये गायकवाड यांनी म्हटले आहे. सदरचा रस्ता मे महिण्याच्या शेवटी केला असून जुन जुलै या दोनच महिण्यात वाट लागली असल्याचे सांगितले आहे.

आमदार पवार हे मनमानी कारभार करत असून सदरचे काम करताना कुणालाही विश्वासात घेण्यात आले नाही असे नमूद करुन साहेब हाच का तुमचा विकास असा प्रश्न विचारला आहे. कंत्राटदारानेही ग्रामपंचायतशी संपर्क साधला नाही किंवा परवानगी घेतली नाही. या कामामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गायकवाड यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केल्याने खळबळ उडाली आहे आणि व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.

नागठाणा येथील दिगांबरराव गायकवाड यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून ७०० मिटरच्या रस्ता कामात करण्यात आलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर तर आणलाच आहे पण लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि कंत्राटदाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker