नायगाव पोलिसांनी 270 किलो गोवंशाचे मांस केले जप्त : तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : गोवंशाची कत्तल करणे व गोवंश कापून मांस विक्री करण्यास बंदी असतांनाही नायगाव येथे गोवंशाचे मांस विक्री करण्यात येत होती. मात्र नायगाव पोलिसांनी रविवारी सकाळी धाड मारुन २७० किलो मांस व एक जीवंत गोवंश असा ३ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस धडकताच गोवंश कापणाऱ्यांनी पळ काढला असल्याने तीन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नायगाव शहरातील खाटीक गल्लीत गोवंश कापून त्याचे मांस विक्री करण्यात येत असल्याची माहिती बिट जमादार साई सांगवीकर यांना रविवारी सकाळी समजली. त्यांनी हि बाब पोलीस निरीक्षक मुंडे यांना सांगितली. नायगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी मुंडे यांच्यासह पोलीस जमादार वाघमारे, पो काँ. शिंदे, वळगे व काही होमगार्ड यांना सोबत घेऊन धाड मारली. यावेळी तीन गोवंश कापलेले दिसले तर एक गोवंश जीवंत आढळून आला. पोलिसांनी धाड मारल्याचे लक्षात येताच गोवंश कापणारे तिघेजन मागच्या दाराने पळ काढला.
केंद्र सरकारने बंदी घातलेले गोवंश कापण्यात आल्याचे दिसून येताच नायगाव पोलिसांनी कापलेल्या गोवंशाचे २७० किलो मांस व एक जीवंत गोवंश असा ३ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बिट जमादार साई सांगवीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपींच्या विरोधात कलम ५, (अ),९,१० आणि प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यात अनेक खाटिक केंद्र सरकारने बंदी घातलेले गोवंश कापून त्याच्या मांसाची विक्री करत आहेत. मात्र नायगाव पोलिसांनी समयसूचकता दाखवत रविवारी सकाळी कारवाई केली असल्याने गोवंशाचे मांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.