चिखलीत लाकडावर कोरलेल्या गणपतीच्या मुर्तीची स्थापना : 63 वर्षाची ऐतिहासिक परंपरा

New Bharat Times नेटवर्क
शिवणी : किनवट तालुक्यातील चिखली(ई) येथे मागील 63 वर्षांपासून लाकडाच्या खोडावर कोरलेल्या गणपतीच्या मुर्तीची स्थापना करण्यात येते. येथे संपूर्ण गावात एकच गणपतीची स्थापना करण्यात येते. हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असल्याने महाराष्ट्र व तेलंगणातील भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. सदरचे गाव महाराष्ट्र तेलंगणाच्या सिमेवर आहे.
किनवट तालुक्यातील चिखली (ई) येथील गणेशोत्सवाला ऐतिहासिक वैभव असल्याने अख्ख गाव श्री च्या सेवेत मग्न असते. येथे 1959 साली लाकडाच्या खोडावर कोरलेल्या मुर्तीची स्थापना करण्याची सुरुवात झाली ती परंपरा आजपर्यंत कायम आहे.
चिखली ई ता.किनवट हे गाव तेलंगणाच्या सीमेवर असून गावातील लोकसंख्या सहाशे ते सातशे आहे या गावात 1959 रोजी गणपतीची स्थापना करण्यात आली यावेळी गावातील कै. बक्कन्ना झरीवाड, कै. किशन झरीवाड, कै. विठ्ठल झरिवाड, व कै. पोषटी रुईवाड, यांनी पुढाकार घेऊन प्रत्येकी नव्वद रुपयाची वर्गणी करून निर्मल तेलंगणा येथील गुंडप्पा सुतार म्हणजेच पाळज येथील सुप्रसिद्ध गणपतीची मूर्ती याच कारागीरांनी बनवली असे ज्येष्ठ नागरिक काढून सांगण्यात येते.
मागील 63 वर्षापासून या गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जातो यावर्षी गणपती उत्सवानिमित्त या गावातील डॉक्टर योगेश सिंगरवाड व डॉ. प्रिती सिंगरवाड दाम्पत्याकडून अकरा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सेवेसाठी गावातील लहान थोर मंडळी सेवा करीत असतात हा गणपती बसवण्यासाठी मोठे सभा मंडप आहे त्यालगत मोठे प्रांगण असून या प्रांगणात स्वयंपाकासाठी खोलीची उभारणी करण्यात आलेली आहे.
हि मुख्य लाकडी गणपतीच्या शेजारी एक लहान गणपतीची मूर्ती ठेवून विसर्जन्याच्या दिवशी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. विसर्जन संपल्यानंतर या लाकडी गणपतीची मूर्ती एका पेटीत बंद करून ठेवली जाते. या गावात दिवाळी दसऱ्यापेक्षाही गणपती उत्सव मोठा साजरा केला जातो येथील गावकरी मंडळी उत्साहाने सहभाग घेत असतात. एक गाव एक गणपतीची आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या या गणेशोत्सवातील ११ दिवसात गावात धार्मिक वातावरण असते.