ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी नगर परिषदेतील १५ कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाईची मागणी… अभियोग चालवण्यास पूर्वपरवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज

New Bharat Times नेटवर्क

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपरिषदेतील १५ कर्मचाऱ्यांनी भाडेतत्त्वावर असलेल्या गाळ्याचे नुकसान केले.गाळ्यातील साहित्याची चोरी व मालमत्तेचे नुकसान केलेल्या गुन्ह्यांमध्ये अभियोग चालविण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वपरवानगी तातडीने मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करत कुंडलवाडी येथील रहिवासी वहाब सिराजोद्दीन शेख यांनी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम २१८ अन्वये अर्ज दाखल केला आहे.

अर्जात नमूद केल्यानुसार, ६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ७:३० वाजता कुंडलवाडी नगरपरिषदेतील १५ कर्मचारी व ट्रॅक्टर चालक यांनी कायदेशीर रित्या भाडेतत्त्वावर असलेल्या गळ्यामध्ये कोणतीही जप्तीबाबत न्यायालयीन किंवा प्रशासकीय परवानगी नसताना प्रवेश केला. यावेळी टिनशेडची तोडफोड करून ४३ कोंबड्या, चिकन डिफे्ंन्डर मशीन,१५ टीनपत्रे व २० लोखंडी अँगल असा एकूण सुमारे २ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने नेल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील चोरी, मालमत्तेचे नुकसान तसेच घरफोडी व अतिक्रमणाशी संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचारी शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असल्याने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला चालविण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अर्जदाराने ७ जुलै व १५ जुलै २०२६ रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही निवेदन सादर केले आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्यानुसार निर्णय घ्यावा, तसेच संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र विभागीय व शिस्तभंगाची चौकशी सुरू करण्याची मागणीही वहाब सिराजोद्दीन शेख यांनी केली आहे. दरम्यान, या अर्जामुळे कुंडलवाडी नगरपरिषद वर्तुळात खळबळ उडाली असून, जिल्हा प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker