प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षकांनी ओव्हरलोड वाळूच्या दोन हायवा पकडल्या

प्रकाश महिपाळे
नायगाव : नरसी मार्गे मुखेडकडे जाणाऱ्या दोन ओव्हरलोड वाळूच्या हायवा बुधवारी सकाळी नायगाव पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधिक्षक शशांत गौडा यांनी होटाळ्याजवळ ताब्यात घेवून ठाण्यात लावल्या आहेत. या हायवावर कारवाई करण्यासाठी आरटीओ मार्फत दंडात्मक कायवाई होण्याची शक्यता आहे. गौडा यांनी केलेल्या कारवाईमुळे अर्थपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या रामतीर्थ व नायगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.
बिलोली तालुक्यात लाल वाळूचा घाट सुरु असून सुरु असलेल्या घाटातून नियमबाह्य वाळूचा उपसा तर होतच असते. याबाबत अनेक तक्रारीही असतात पण वाळूच्या अर्थकारणात महसूल, पोलीस, आरटीओ सह अनेक यंत्रणा सक्रीय असल्याने काहीही होत नाही. त्यामुळे नियमबाह्य वाळू उपस्याबरोबरच ओव्हरलोड वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दररोज शेकडो ओव्हरलोड वाळूची वाहणे कर्नाटक व लातूर जिल्ह्यात जातात मात्र रामतीर्थ पोलीस याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असतात.
रामतीर्थ ठण्याबरोबरच नायगाव पोलीस ठाण्याचे निष्क्रिय पोलीस निरीक्षक मारकड यांचेही दुर्लक्ष असतेच त्यामुळे सध्या नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक शशांत गौडा यांनी या ओव्हरलोड वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी बुधवारी मैदानात उतरले.
सकाळी एम एच ४६ सी एल ४६१९ व एम एच २४, बी डब्ल्यू ७३३७ या क्रमांकाच्या दोन हायवा नरसी मार्गे मुखेडकडे जात असतांना होटाळ्याजवळ थांबवून शशांत गौडा यांनी कागदपत्रे व परवाना तपासला आणि हायवात मर्यादेपेक्षा जास्त म्हणजेच ओव्हरलोड वाळू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्या दोन्ही हायवा ताब्यात घेवून नायगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या.
ताब्यात घेतलेल्या दोन्ही हायवात मर्यादेपेक्षा जास्त किती वाळू आहे याबाबत आरटीओला पत्र पाठवण्यात आले असून. त्यानंतर कारवाई करण्यात येईल अशी माहिती गौडा यांनी दिली आहे.



