मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या साडेचार हजार बहिणींच्या बँक खात्याला आधार लिंक नाही
तत्काळ आधार लिंक करुन घेण्याचे तहसीलदारांचे आवाहन

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या तालुक्यातील ४ हजार ५०० महिलांनी अद्यापही बँक खात्याला आधार लिंक केली नसल्याची बाब समोर आली आहे. अशा महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. आधार लिंक नसलेल्या महिलांची गावनिहाय यादी तलाठ्याकडे दिल्या आहेत. त्यामुळे महिलांनी तलाठ्याशी संपर्क साधून तत्काळ बँक खात्याला आधार लिंक करुन घ्यावे असे आवाहन तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड यांनी केले आहे.
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु झाल्यानंतर अर्ज भरताना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करुन महिलांनी अर्ज भरले आहेत. सुरुवातीला शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अँपवरुन अर्ज भरण्यात आले पण अर्ज भरतांना अनेक अडचणीचा सामना करत नायगाव तालुक्यातील २६ हजार ८६१ महिलांनी अर्ज भरला यातील जवळपास २५ अर्ज तालुका समितीने मंजूरही केले आहेत. मात्र अद्यापही सेतूकेंद्रावरुन भरलेल्या अर्जाची आकडेवारी संबधीत यंत्रणेकडे आली नाही. पुढील दोन तीन दिवसांत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री दोन महिण्याची रक्कम देणार आहेत त्यामुळे जी यादी आली त्याची तपासणी होवून अर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेला मोठा वेग आला आहे.
प्राप्त अर्ज भरत असताना नायगाव तालुक्यातील तब्बल ४ हजार ५०० महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसल्याची माहिती समोर आली आहे. बँक खात्याला आधार लिंक नसल्याने या योजनेची रक्कम जमा होण्यास अडचणी येवू शकतात. त्यामुळे बँक खात्याला आधार लिंक नसलेल्या महिलांची तहसील कार्यालयाने गावनिहाय यादी तयार केली आहे. ही यादी त्या त्या गावच्या तलाठ्याकडे दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेल्या महिलांनी तलाठ्यांशी संपर्क साधून त्या यादीत आपले नाव आहे का हे पहावे. असल्यास तत्काळ आपल्या बँक खात्याला आधार लिंक करुन घ्यावी असे आवाहन तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड यांनी केले आहे.