विशेष पथकाची जुगार अड्ड्यावर धाड 14 जुगाऱ्यावर नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकळगाव परिसरात शेख समीर यांचे शेतातील मोकळ्या जागेत सुरु असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर विशेष उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी धाड मारुन 14 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. हद्दीचा वाद निर्माण झाल्याने शहाजी उमाप यांनी दोन तास कुंटूर पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले होते पण शेवटी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणात फक्त 1 लाख 13 हजाराचा मुद्देमाल दाखवण्यात आला असल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. विशेष उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाला नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकळगाव शिवारात शेख समीर यांचे शेतातील मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यावरून या पथकाने शनिवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान जुगार अड्ड्यावर धाड मारली.
यावेळी संजय शंकर बानेवाड घुगराळा, नायगांव, शेख खदीर शेख दस्तगीर घुगराळा, नायगांव, शेख गौस शेख हारुनसाब देगलूर, मंगेश दतात्रय कपाळे देगलूर, अविनाश उत्तमराव पाळेकर नायगाव, सुनिल गोविंद पवार कुंटूर तांडा, बाबू बळी गज्जेवाड बरबडा, कोंडीबा माधव भंडरवार बरबडा, नागेश देवराव जाधव नरसी, राजेश सोपान भोईवाड कुष्णूर, ओम बालाजी बानेवाड घुंगराळा, शिवाजी बाबुराव ससाणे देगलूर, शेख समीर शेख दस्तगीर घुंगराळा व शेख नदीम नायगाव अदि 14 लोक तिर्रट जुगार खेळताना आढळून आले.
या सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले पण यातील नायगाव शहरातील मटकाकिंग शेख नदीम हा मटकाकिंग हा फरार झाला आहे. या सर्व आरोपींची पंचासमक्ष झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून 1 लाख 13 हजार रोख रक्कम, 1 लाख 60 हजाराचे 12 मोबाईल आणि 60 हजाराची मोटारसायकल अदि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर धाड मारण्यात आल्याची जोरदार चर्चा तर झालीच पण यात दोन मोठे फायनान्सर होते. त्यामुळे या ठिकाणी 20 लाखाच्या वर रक्कम असावी अशी कुजबूज होत आहे.
विशेष उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलीस अधीक्षक अवैध धंदे बंद करण्याचे वारंवार आदेश देत असले तरी ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवून अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे.