दोन दिग्गजांच्या माघारीने नायगाव मतदार संघात महाविकास आघाडीची ताकद वाढली
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव विधसभेच्या आखाड्यातून जरांगे समर्थक शिवराज होटाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोरठेकर बंधूंनी शेवटच्या दिवशी माघार घेतली आहे. या दोन दिग्गजांनी माघार घेतल्याने तिरंगी सामना होणार असला तरी नायगाव मतदार संघात महाविकास आघाडीची ताकत वाढली आहे.
नायगाव विधानसभा निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले होते. या उमेदवारी अर्ज छाणणीत रासपच्या एका उमेदवारासह ९ अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे २६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अर्ज माघारीच्या पहील्या दिवशी २ तर शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरिष गोरठेकर व कैलास गोरठेकर यांनी व मनोज जरांगे यांच्या वतीने शिवराज होटाळकर यांनी उमेदवारी दाखल केली होती.
गोरठेकर व होटाळकर यांच्यामुळे निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला होता. गोरठेकर अपक्ष व होटाळकर जरांगे यांच्या कडून निवडणूक लढवतील अशी चर्चा होत होती पण सोमवारी सकाळी गोरठेकर बंधूंनी तर दुपारच्या नंतर होटाळकरांनी आपले अर्ज मागे घेतले. या दोन दिग्गजांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या डॉ. मिनल खातगावकर, वंचितचे डॉ. माधव विभूते व भाजपचे राजेश पवार प्रमुख उमेदवारासह दहा विधानसभेच्या आखाड्यात राहीले आहेत.
मनोज जरांगे समर्थक शिवराज होटाळकर व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरिष व कैलास गोरठेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीच्या गोटात आनंदाच्या उकळ्या तर फुटू लागल्याच पण या दोन दिग्गजांच्या उमेदवारी राहीली पाहिजे यासाठी खालच्या पातळीवरुन टिका करत उचकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र दोघांनाही मुरब्बीपणा दाखवला.
परंतु मनोज जरांगे यांनी शेवटच्या क्षणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे होटाळकरांचा नाईलाज झाला. होटाळकरांनी तर अगोदर अपक्ष तयारी केली होती मात्र नंतर मनोज जरांगे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपल्या समर्थकांशी चर्चा केली आणि यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले तरीही त्यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला.
गोरठेकर बंधूंनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन एक बैठक घेतली व आपली ताकत दाखवून देण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. पण यामुळे महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे पक्षीय स्तरावरून गोरठेकरांशी संपर्क साधून आपल्या स्थानिक पातळीवर मदत करणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांची मनधरणी करण्यात आली त्यामुळे त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
नायगाव मतदार संघाची निवडणूक अटीतटीची व काट्याची होणार होती पण या दोन दिग्गजामुळे महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याचीही शक्यता वाढली होती. परंतु या दोन दिग्गजांच्या माघारीमुळे मतदार संघातील चित्र तर स्पष्ट झालेच पण महाविकास आघाडीची ताकत वाढली आहे.