ताज्या बातम्यानांदेडबिलोली

प्रवाशांचा जीव धोक्यात! देगलूर-पुणे खासगी ट्रॅव्हल्समधून ज्वलनशील दुचाकींची सर्रास वाहतूक

नियम धाब्यावर ; आरटीओ प्रशासनाचे दुर्लक्ष, मोठ्या दुर्घटनेची शक्यता

मोरे मनोहर

​किनाळा :- प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून ज्वलनशील वस्तूंची वाहतूक करण्यास कायद्याने सक्त मनाई असताना, देगलूर-पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समधून पेट्रोल भरलेल्या मोटारसायकलची सर्रास वाहतूक केली जात आहे. केवळ काही रुपयांच्या आर्थिक फायद्यासाठी ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असून, प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा संताप सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

डिक्कीमध्ये ‘चालता-फिरता’ बॉम्ब

​मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर ते पुणे आणि पुणे ते देगलूर अशा दररोज अनेक खासगी ट्रॅव्हल्स धावतात. या ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी असलेल्या डिक्कीत चक्क पेट्रोल भरलेल्या मोटारसायकली कोंबल्या जातात. एका दुचाकीसाठी साधारण एक हजार रुपये भाडे आकारले जाते. १० ते १२ तासांच्या या प्रदीर्घ प्रवासात इंजिनच्या उष्णतेमुळे किंवा घर्षणामुळे जर या पेट्रोलचा भडका उडाला, तर भीषण दुर्घटना घडून मोठा अनर्थ ओढवू शकतो. मात्र, ‘अति घाई आणि पैशाची हाव’ यामुळे नियम पायदळी तुडवले जात आहेत.

प्रवाशांची आर्थिक लूट सुरूच

​ग्रामीण भागातील शेकडो नागरिक रोजगारासाठी पुण्यात स्थायिक झाले आहेत. एसटी महामंडळाच्या तुलनेत आरामदायी प्रवासाचे आमिष दाखवून खासगी ट्रॅव्हल्सनी प्रवाशांना आपल्याकडे वळवले आहे. मात्र, या प्रवासासाठी कोणतेही निश्चित तिकीट दर नसल्याने प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारले जात आहे. ऐनवेळी प्रवाशांची अडवणूक करून त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.

प्रशासन ढिम्म; अपघाताची वाट पाहतेय का?

​शासकीय नियमांनुसार प्रवासी बसमध्ये कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ नेणे हा गुन्हा आहे. असे असतानाही, डोळ्यांदेखत ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत दुचाकी चढवल्या जात आहेत. आरटीओ (RTO) विभाग आणि पोलीस प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जागी होणार का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

“१०-१० तास चालणाऱ्या या गाड्यांमध्ये पेट्रोल भरलेल्या गाड्या नेणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. प्रशासनाने यावर तात्काळ बंदी घालून दोषी ट्रॅव्हल्स मालकांवर कडक कारवाई करावी.” प्रवासी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker