जुगार अड्ड्यावर रामतीर्थ पोलीसांची धाड : तिघांच्या मुसक्या आवळल्या सात जुगारी पळाले

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव शिवारात खैरगाव रस्त्याच्या बाजूला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर दि.9 रोजी पहाटेच्या दरम्यान रामतीर्थ पोलिसांनी धाड टाकली. यावेळी ३ जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तर सात जुगारी पळून जाण्यात यशस्वी ठरले तर घटनास्थळावरुन आडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे नायगावसह कुंटूर व रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे सुरु असल्याचे स्पष्ट झाले.
लोहगाव बिटमधील खैरगाव रोडवर काही जुगारी जुगार खेळत असल्याची माहिती रामतीर्थ पोलिसांना मिळाली. यावरून रामतीर्थ पोलिसांनी दि.9 रोजी पहाटे सदर ठिकाणी धाड मारली. त्यावेळी दहा जुगारी गोलाकार बसून पत्यावर पैसे लावताना दिसून आले. पोलीस आलेले प हताच काही जुगाऱ्यांनी पळ काढला.
परंतु शिवाजी गोविंदराव चव्हाण रा.नायगाव, नागनाथ राम गायकवाड रा.नायगाव, महेश लक्ष्मण गंजलवाड रा.मनसक्करगा ता.देगलुर या तीन जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. या तिघांना ताब्यात घेवून पळून गेलेल्यांची नावे विचारण्यात आली असता भगतसिंग उर्फ शेरसिंग रा.नायगांव, जाकीर शेख रा.खैरगांव, साईनाथ शिपाळे पाटील रा. नायगांव, किरण घंटेवाड रा.खैरगांव, अशोक पवार रा.नायगांव, गणेश कोतावार (मास) रा होटाळा व व्यंकट शिंदे पाटील रा माजरंम असे असल्याचे सांगीतले.
घटनास्थळावरुन रामतीर्थ पोलिसांनी २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कर्मचारी अशोक विठठलराव यरपलवाड यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात दहा जुगाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वेळी मुख्य जुगार चालकासह अन्य पाच जुगाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षकांनीच सोडल्याची चर्चा होत आहे.
विशेष म्हणजे रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या त्या उपनिरीक्षकाकडे अनेक महत्वाचे तपास असतांना ते तपास करतच नाहीत तडजोडी करुन वेळ मारुन नेतात व गुन्ह्याची तिव्रता कमी करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. या कारवाईतही त्यांनी जाणीवपूर्वक जुगाऱ्यांना सोडल्याची चर्चा होत असून या गंभीर प्रकाराची वरिष्ठांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.



