गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

अबब…नायगांव तालुक्यात गुढीपाडव्याला फुटणार तब्बल तीन लाख नारळ

सालगड्याचे भाव वधारले ; शेतकरी मात्र आर्थिक संकटात

सय्यद जाफर

नायगाव :- हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवणारा गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर मनोभावाने सर्वत्र नायगांव तालुक्यात यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने गुढी उभारणे, नवीन कपडे परिधान करणे आणि गावागावातील हनुमान मंदिरात पूजा-अर्चना करून नारळ फोडण्याची प्रथा यंदाही मोठ्या प्रमाणात पार पडणार आहे.

तालुक्यातील विविध गावांमध्ये असलेल्या हनुमान मंदिर येथे भक्तांकडून आणि नागरिकांकडून मोठ्या संख्येने नारळ फोडले जातात. यावर्षी ही संख्या तब्बल तीन लाखांच्यावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत नारळांची मागणी वाढली असून व्यापाऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात साठाही उपलब्ध करून ठेवला आहे.

मात्र, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी हा सण यंदा तितकासा आनंददायी राहणार नाही, असे चित्र दिसत आहे. कारण शेती कामासाठी लागणाऱ्या सालगड्यांच्या मजुरीत मोठी वाढ झाली आहे. सध्या सालगडी वर्षाला १ ते १.५ लाख रुपये मजुरी घेत असून त्यासोबतच सुमारे १ लाख रुपये अॅडव्हान्स स्वरूपात मागत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून सालगाडी ठरवल्यानंतर त्या सालगड्याला चंदीच्या स्वरूपात ज्वारी किंवा गहू हे ही द्यावे लागते. तर काही ठिकाणी त्याच्या जेवणाचा संपूर्ण भार उचलावा लागतो. एवढे सारे झाल्यानंतरही शेतकरी मात्र त्या सालगड्याला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंग भरून कपडे घेतो. आणि त्याच्या आनंदात आपलाही आनंद साजरा करतो.

नैसर्गिक आपत्ती, पिकांचे अनिश्चित उत्पादन आणि वाढते शेती खर्च यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या वाढलेल्या मजुरीमुळे आणखी संकटांचा सामना करावा लागत आहे. परिणामी, गुढीपाडवा साजरा करताना पारंपरिक उत्साह असला तरी आर्थिक वास्तवाची झळ ग्रामीण भागात स्पष्टपणे जाणवत आहे. एकीकडे धार्मिक परंपरा आणि श्रद्धेचा उत्साह, तर दुसरीकडे वाढती महागाई आणि मजुरीचा बोजा—या दुहेरी परिस्थितीत यंदाचा गुढीपाडवा नायगांव तालुक्यात वेगळ्याच पार्श्वभूमीवर साजरा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान शेतकरी आणि समस्त हिंदू समाजाच्या या नववर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी घरोघरी गुढी उभारून आपापल्या गावातील हनुमान मंदिरात जाऊन पूजा अर्चना करत मनोभावाने दर्शन घेऊन नारळ फोडण्याची प्रथा चालत आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या वर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नायगांव तालुक्यातील ८९ गावातील हनुमान मंदिरात सुमारे तीन लाखाच्या वर नारळ फुटणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker