यादव लोकडे
बिलोली : तालुक्यातील मौजे हुनगुंदा येथील शासकीय रेती घाटावर स्थानिक ठेकेदारांचा मनमानी कारभार चालला असून येथिल ठेकेदार मोठया प्रमाणात वाहन धारकांकडून गाडी भरण्याच्या नावाखाली रक्कम वसूल करत असल्याची तक्रार विपुल पटणे यांनी महसूल अधिका-यांकडे केली आहे. त्यामुळे सदरील रेती ठेकेदाराचा अनधिकृत वसुलीस महसूल अधिका-यांचा छूपा पाठिंबा आहे कां असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथे गेल्या काही दिवसापासून शासकीय रेती डेपो चालू असून या डेपोत कोणताही महसूल अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे ठेकेदार आपल्या मनाप्रमाणे वाहन धारकांकडून मोठया प्रमाणात रक्कम वसूल करत आहे, तर अनेक गाड्या विना वेबिल भरून शासनाचा महसूल बुडवत आहे.
असे असताना सुद्धा तालुक्यातील महसूल अधिकारी याकडे जाणीवपुर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा पदाधिकारी यांनी शासनाकडे सदर ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचत लेखी तक्रार सादर केली आहे,त्यामुळे आता तरी तालुका प्रशासन सदर ठेकेदाराच्या अनधिकृत वसुलीवर अंकुश बसवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.