युनायटेड पद्यशाली संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 5 मार्च रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : एसबीसी अन्याय निवारण कृती समिती व विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून युनायटेड पद्यशाली संघटनेच्या वतीने उद्या दि. 5 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी पद्मशाली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनायटेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहीत अडकटलवार यांनी केले आहे.
वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी (एस.बी.सी.) २ टक्के स्वतंत्र आरक्षण २०२५ च्या सत्रापासून लागू करावे. विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात १० आश्रम शाळा सुरू कराव्यात. विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के राजकीय आरक्षण लागू करावे. विद्यार्थीना जात पडताळणी प्रमाणपत्र तत्काळ दयावे, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या योजना साठी एस.बी.सी. व केंद्र शासनाच्या योजनासाठी ओ.बी.सी.प्रमाणपत्र द्यावे, विशेष मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करावे.
एसबीसी विद्यार्थी साठी स्वतंत्र वस्तीगृह सुरू करावे, एसबीसी कर्मचाऱ्यांना शासकीय व निमशासकीय सेवेत पदोन्नती दयावी व विणकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी विणकर आर्थिक महामंडळावर विणकरांची नियुक्ती करून लवकरात लवकर काम सुरू करावे. यासाठी एसबीसी अन्याय निवारण कृती समिती व विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यासाठी साखळी उपोषण व धरणे आंदोलन पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि. 5 ते 9 मार्च दरम्यान आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे येथे होणार आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी काल दि. 2 मार्च रोजी अखिल भारत युनायटेड पद्मशाली संघम संलग्न महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संघम व मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघम सर्व प्रौढ युवक व महिला नांदेड जिल्हा व तालुका युनायटेड पद्मशाली संगमची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहित अडकटलवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यावेळी पुणे येथील आंदोलनाला पाठींबा म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 5 मार्च रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अडकटलवार यांनी केले आहे.