कुंडलवाडी शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने चोरट्यांनी फोडले
◆ दोन्ही दुकानातून ५८ हजार रुपये चोरीला ◆ चोरट्यांना पकडण्याचे कुंडलवाडी पोलिसांसमोर आव्हान

कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील मैनोद्दीन शेख यांचे भुसार दुकान व अब्दुल रहीम बाबा यांचे किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून ५८ हजार रुपये नगदी चोरी केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने फोडल्याने कुंडलवाडी पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले असून व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

कुंडलवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर मैनोद्दीन शेख यांचे भुसार दुकान व अब्दुल रहीम बाबा यांचे किराणा दुकान आहे. दररोजच्या प्रमाणे दोन्ही दुकाने बंद करून दोन्ही मालक घरी गेले होते. आज दि.३ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी दुकान फोडल्यानंतर दुकानाचे कुलूप तोडून चोरी केल्यानंतर जसेच्या तसे कुलूप लावले. कुंडलवाडी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकाँ गफूर शेख, पोहेकाँ क्षशंकर चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांच्या समक्ष दुकानात दोन्ही दुकानात प्रवेश केल्यानंतर दुकानातील सामान अस्तव्यस्त फेकल्याचे दिसून आले तसेच मैनोद्दीन शेख यांच्या दुकानातील गल्ल्यातून ५० हजार रुपये नगदी व अब्दुल रहीम बाबा यांच्या दुकानातील ८ हजार रुपये असे एकूण ५८ हजार रुपये चोरीला गेले आहेत याप्रकरणी मैनोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुंडलवाडी शहरातील मुख्य रस्त्यावरच व्यापाराने दोन दुकाने फोडून कुंडलवाडी पोलिसांसमोर चोरटे पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कुंडलवाडी पोलिसांनी चोरीच्या घटना टाळण्यासाठी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्यांनी कुंडलवाडी पोलीस नेमकी रात्रीच्या वेळेस गस्त कुठे करतात हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.