अंतरगाव येथे नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारी यंत्रणा जप्त : रात्री दोन वाजता तहसीलदारांची धाडसी कारवाई

अंकुशकमार देगावकर
नायगाव : बरबड्याच्या वादी मंडळ अधिकारी शितल स्वामी कुंटूर पोलीसांच्या छुप्या पाठींब्याने तालुक्यातील अंतरगाव येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड यांना समजली. त्यांनी रविवारी रात्री उशिरा दोन वाजताच्या दरम्यान धाड मारुन अवैध वाळू उपसा करणारी गुडगुडी व ट्रक्टर जप्त केला आहे. या कारवाईमुळे महसूलचेच अधिकारी महसूल विभागाला टोपी घालण्याचा उद्योग करत असल्याचे दिसून आले आहे.

नायगाव तालुक्यातील बरबडा मंडळ हा महसूल विभागासाठी डोकेदुखी ठरत असून या भागाच्या वादग्रस्त मंडळ अधिकारी शितल स्वामी या मुख्यालयी तर राहतच नाहीत पण वाळू माफीयांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असल्याचे मागील चार कारवाई वरून रविवारी रात्री तहसीलदारांनी कारवाई केलेल्या पाचव्या घटनेवरून दिसून येत आहे. महसूल विभागाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्यासाठी हातभार लावणाऱ्या मंडळ अधिकारी स्वामी यांचे अनेक कारनामे उघड झालेले असताना त्यांना अभय देण्याचे काम तहसीलदार करत आहेत होते विशेष.
नायगाव तालुक्यातील इतर मंडळात वाळूचा गोरखधंदा बंद झाला असला तरी स्वामी मंडळ अधिकारी असलेल्या बरबडा भागात मात्र वाळू माफीया सक्रिय असून या माफीयांना मंडळ अधिकारी तर अर्थिक तडजोडी करुन अवैध वाळू उपसा करण्यासाठी मुक समंती तर देतच आहेत पण कुंटूर पोलीसही वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे काम करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक एकीकडे वाळू माफीयांच्या मुसक्या आवळण्याचे काम करत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणेकडून वाळू माफीयांशी आर्थिक तडजोडी करुन बळ देण्याचा उद्योग करत असल्याचे दिसून येत आहे.
बरबडा भागात वाळू माफीयांच्या विरोधात तहसीलदारांनी यापूर्वी चार कारवाया केल्या असून अंतरगाव येथील पाचवी कारवाई आहे. अंतरगाव येथे गुडगुडीच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा दोन वाजताच्या दरम्यान थेट नदी पात्रात जावून कारवाई करण्याचे धाडस तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी दाखवली आहे. वास्तविक याबाबत कुणालाही माहिती कळू तर दिलीच नाही पण वाळू माफीयांना हालचाली कळू नयेत यासाठी अर्धा किलोमीटर अंतरावर वाहण लावून पायी जावून धाडसी कारवाई केली आहे.
या कारवाईत तहसीलदारांनी गुडगुडीसह ट्रक्टरही जप्त करुन तहसील कार्यालयात लावला आहे. अवैध वाळू उपसा करणारी यंत्रणा पकडल्यावर एकही माफीया पुढे आला नाही पण खाकीतील काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण तहसीलदार गायकवाड यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. बरबडा परिसरात वारंवार घडणाऱ्या घटनेला जबाबदार धरून मंडळ अधिकारी शितल स्वामी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.