नांदेड जिल्हा परिषदेत ‘प्रभारीं’चा मनमानी कारभार; आवारात दुर्गंधीचे साम्राज्य, तर नवनियुक्त अभियंत्यांचा स्वतःच्या दालनाच्या रंगरंगोटीचा अट्टहास!
बातमी कव्हर करायला गेलेल्या पत्रकारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न

New Bharat Times नेटवर्क
नांदेड: सध्या प्रशासक राजवटीखाली असलेल्या नांदेड जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात खांदेपालट होताच, नवनियुक्त प्रभारी कार्यकारी अभियंता बी. एम. पवार यांनी पदभार स्वीकारताच स्वतःच्या ऐटीसाठी दालनाची रंगरंगोटी व दुरुस्ती करण्याचा अट्टहास सुरू केला आहे. एकीकडे संपूर्ण जिल्हा परिषद इमारत आणि आवार कचरा, ड्रेनेजचे घाण पाणी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे दुर्गंधीच्या विळख्यात सापडले असताना, दुसरीकडे मात्र नवे साहेब स्वतःचे दालन चकाचक करण्यात मग्न असल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या नांदेड जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय राजवट सुरू आहे. अनेक विभागांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर असल्याने मनमानी कारभाराला उधाण आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मेघना कावली या सध्या रजेवर गेल्या असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्याकडे तात्पुरता पदभार आहे. रजेवर जाण्यापूर्वी मेघना कावली यांनी बांधकाम विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळावा म्हणून संजय शिंदे यांना हटवून उपअभियंता बी. एम. पवार यांच्याकडे प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त भार सोपवला.

बी.एम.पवार यांच्या पूर्वइतिहासातील गैरव्यवहार, अनियमितता आणि मनमानी कारभाराविरोधात पुराव्यांसह अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. असे असताना, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी वरिष्ठांनी थेट कार्यकारी अभियंता पदाचे ‘बक्षीस’ दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पदभार मिळताच पवार यांनी ‘हम करे सो कायदा’ अशा थाटात पुन्हा आपला मनमानी कारभार सुरू केला आहे.

यापूर्वीच्या कार्यकारी अभियंत्यांनी याच दालनातून आपला कार्यभार चोखपणे सांभाळला होता. मात्र, पवार यांनी रुजू होताच लाखो रुपयांचा अनाठायी खर्च करत दालन सजवण्याचे काम हाती घेतले आहे. याउलट, जिल्हा परिषद मुख्यालयाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.
मुख्य इमारतीमधील अनेक स्वच्छतागृहे कुलूपबंद आहेत. ड्रेनेजचे घाण पाणी: महिला व बालविकास विभागाच्या बाजूला असलेल्या उघड्या नालीतून आणि ड्रेनेजमधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. यामुळे डासांची मोठी उत्पत्ती झाली असून, कर्मचारी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विभागप्रमुखांनी याबाबत लेखी पत्र देऊनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले. अंधाराचे साम्राज्य व कचरा: अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांनजीक घाण साचली असून पथदिवे बंद आहेत. संपूर्ण जिल्ह्याला पर्यावरणाचे धडे देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या आवारात तोडलेल्या झाडांच्या फांद्यांचे ढीग आणि भंगार वाहने तशीच पडून आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय पातळीवर अनाठायी आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे, तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन वारंवार केले आहे. मात्र, शासनाचे हे आदेश धुडकावून लावत केवळ स्वतःच्या सुखासाठी शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या या प्रभारी अभियंत्यावर स्थानिक वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का? असा सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
पत्रकारांना मज्जाव; ‘साहेबांकडे जा, ते खुश करतील’चे आमिष!
या रंगरंगोटीच्या उधळपट्टीची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी बांधकाम विभागात कव्हरेजसाठी गेले होते. त्यावेळी तेथील एका कर्मचाऱ्याने छायाचित्रे आणि व्हिडिओ शूटिंग घेण्यास पत्रकारांना मज्जाव केला. इतकेच नव्हे तर, “आमच्या साहेबांकडे जा, ते तुम्हाला खूश करतील,” असे म्हणत पत्रकारांना थेट आमिष दाखवण्याचा आणि प्रकरण दडपण्याचा किळसवाणा प्रयत्न केला. मात्र, पत्रकारांनी या आमिषाला बळी न पडता आपले कर्तव्य बजावत प्रशासनाचा हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला.



