पंचायत समिती नायगाव येथे कै.वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी

शेषेराव कंधारे
नायगाव :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती पंचायत समिती सभागृह नायगाव येथे आज कृषीदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तहसीलदार डॉ.सौ.धम्मप्रिया गायकवाड हे होत्या तर व्यासपिठावर तालुका कृषी अधिकारी दिपेश देवारे, गटविकास अधिकारी संजय मिरजकर, माजी विस्तार अधिकारी सुगावे, शेतकरी व्यंकटराव पाटील सह आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. त्यानंतर कै.वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी, तसेच सामाजिक योगदानासह त्यांच्या जीवनकार्यावर आपल्या भाषणातून अनेकांनी प्रकाश टाकला.
उपस्थित शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन अनिल जोंधळे यांनी केले. नायगाव पंचायत समितीच्या सभागृह कार्यालयात जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुखेडकर यांनी केले तर आभार मयुर जिरवनकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.