शिक्षकांनी गोर-गरीब लेकरांना विविध योजना व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन राज्यस्तरावर चमकवावे – शिक्षणाधिकारी (यो) दिलीपकुमार बनसोडे

New Bharat Times नेटवर्क
किनवट : आपणही सामान्य कुटूंबातूनच इथपर्यंत आलोय. आपल्या शिक्षकांनी पूश केलं म्हणून आपण पुढे आलोत. याची जान ठेऊन शिक्षकांनी अशिक्षित गोर-गरीब पालकांच्या लेकरांना शासनाच्या अनेक शिष्यवृत्ती , योजनांचा लाभ व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरावर कसे चमकतील यासाठी सतत प्रयत्न करावे , असे प्रतिपादन जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे यांनी केले.
येथून जवळच असलेल्या कोठारी (चि) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित योजनांचा जागर , तंबाखूमुक्त शाळा प्रशिक्षण व मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने , उप शिक्षणाधिकारी (योजना) माधव शिंगडे , शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, शिवचरण जम्पलवाड, शोभा भारती, मनीषा बडगिरे, प्रताप राठोड, शेख रुस्तुम, प्राचार्य प्रमोद मुनेश्वर, शेषेराव पाटील यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व उपाययोजना या विषयी माहिती दिली. गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी आभार मानले. यावेळी भूमय्या इंदुरवार व मौला उंदरीवाले यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियानाविषयी विस्तृत माहिती दिली. शिक्षण विस्तार अधिकारी शिवचरण जम्पलवाड यांनी यूडायस प्लस, आधार व्हॅलिडेशन, ड्रॉप बॉक्स, एक पेड मॉ के नाम, इको क्लब स्थापना, अमृतवृक्ष व विविध लिंक भरणे याविषयी माहिती दिली. शेख रुस्तुम यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल विषयी माहिती दिली.
उपशिक्षणाधिकारी (योजना) माधव शिंगडे यांनी योजना कार्यालयाच्या विविध शिष्यवृत्या , राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना , सारथी शिष्यवृती , समाजकल्याण विभागाच्या सवित्रीबाई फुले , अस्वच्छ व्यवसायत काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती , इबीसी , शिक्षकांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक अर्थ सहाय्य , छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती , इ. 10 वी परीक्षा शुल्क , यासह इतर मागास बहुजन कल्याण विभाग व आदिवासी विभागाची शिष्यवृत्ती या विषयी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा दहेलीचे 6 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख प्रमोद कांबळे यांचा , शासकीय आश्रम शाळा , पाटोदा (खु) येथील 5 विद्यार्थी शिष्यवृती धारक झाल्याबद्दल बालाजी उठफळे यांचा व श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय, दहेली येथील 7 विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मुख्याध्यापक मधुसूदन पहुरकर यांचा शिक्षणाधिकारी (यो) श्री बनसोडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख , सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म. फुले विद्यालयाचे उप मुख्याध्यापक किशोर डांगे, एमकेटीचे मुख्याध्यापक शेख शहेबाज , तथागत पाटील , गट साधन केंद्राचे बाबूराव इब्बितदार , राजेंद्र कंतुलवार व सुनिल चव्हाण आदिंनी परिश्रम घेतले.
“आयडॉल शिक्षक शोधून त्यांच्या गुणवत्ता मंडळाद्वारे तालुक्यात शिष्यवृत्तीसह विविध स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्यासाठी जादा वर्ग घेण्याचं नियोजन आहे.
– गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने



