उस्माननगर पोलीसांची येळी व कौडगाव येथे कारवाई 4 कोटी 72 लाखाचे साहित्य जप्त : पाच वाळू माफीयांच्या विरोधात गुन्हे नोंद

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : उस्माननगर पोलीस ठाण्याचे धडाकेबाज सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी लोहा तालुक्यातील येळी व कौडगाव येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणी दि. 31रोजी सकाळी आपल्या पथकासह धाड मारुन जेसीबी, बोटी, फायबर बोटी असा एकुण 4 कोटी 72 लाखाचा मुद्देमाल केला जप्त केला. तर पाच वाळू माफीयांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या बोटी सायंकाळच्या दरम्यान स्फोटकाच्या सहायाने नष्ट करण्यात आल्या.

लोहा तालुक्यातील वाळू माफीयांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याने या माफीयांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला होता. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून येळी व कौडगाव शिवारात दिवसरात्र गोदावरी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपास करण्यात येत होता. ही माहिती उस्माननगर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांना समजताच त्यांनी ही माहिती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली.

कायवाई करण्यासंदर्भात वरिष्ठाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, संजय मुंडे, पोहेकॉ गंगाधर चिंचोरे, निलप्पा शिवपुरे, मधुकर पवार, सुशिल कुबडे, श्याम वडजे, पोकों/प्रकाश पेदेवाड, माधव पवार, तुकाराम पवार, राठोड यांना सोबत घेवून दि. 31 जुलै रोजी सकाळी येळी व कौडगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात धाड मारली यावेळी मोठ्या बोटी, छोट्या फायबर बोटी आणि जेसीबीच्या सहायाने वाळू उपसा करण्यात येत असल्याचे दिसून आले.

पोलीस दिसताच वाळू उपसा करणारे इसम पाण्यात उड्या मारुन पळून गेले. सदर ठिकाणी अवैध वाळू उपसा करणारे साहित्य जेसीबी 07, मोठ्या फायबर बोट 04, छोटया इंजिन बोट 06 व काळी रेती साठा 50 ब्रास असा एकुण किंमती 4,72,10,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तहसील कार्यालय, लोहा यांचेकडून जप्ती पंचनामा करुन संभाजी प्रभाकर सोमवारे रा.येळी, व्यंकटी आनंदराव ढगे रा.मारतळा, संदिप रामराव ढेपे रा.मारतळा, ओमप्रकाश एकनाथ जाधव रा.चिंचोली व गजानन सुदाम हावणे रा.कौडगाव अदि वाळू माफीयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मोठी गुप्तता पाळत केल्याने माफीयांचे कंबरडे तर मोडलेच पण पाच माफीयांच्या विरोधात गुन्हे नोंदवून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार, पोलीस स्टेशन उस्माननगर येथील नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगीरी केल्यामुळे त्यांचे मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
येळीतून पळालेल्या बोटी कुंटूर पोलिसांनी पकडल्या…
येळी व कौडगाव येथे पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यामुळे माफीयांनी दोन मोठ्या बोटी व दोन फायबर बोटी बरबडा परिसरातील नदी पात्रात पळवल्या. ही माहिती कुंटूर पोलिसांना मिळाल्यानंतर कुंटूर पोलिसांनी त्यांच्या हद्दीत आलेल्या दोन मोठ्या बोटी व दोन फायबर बोटी जप्त केल्या असल्याची माहिती पोहेका अभिजित पाटील यांनी दिली आहे.



