बरबड्यात निकृष्ट नाली बांधकामाचे खड्डे बनले “जीवघेणे”.!!
नालीत दुचाकी अडकली : सुदैवाने जीवितहानी टळली

बरबडा : भगवान शेवाळे
नायगाव तालुक्यातील बरबडा या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलेल्या नालीवरच्या बांधकामाची अवस्था फारच दयनीय झाली आहे. बांधकामानंतर अवघ्या काही दिवसातच नाली वरचा स्लॅब कोसळायला सुरुवात झाली. यासंदर्भात रस्ता आणि निकृष्ट नाली बांधकामाबाबत बातम्या प्रकाशित होऊनही याकडे संबंधित विभागाने लक्ष दिलं नाही परिणामी बुधवारी रात्री एक दुचाकी या खड्ड्यात पडून मोठ नुकसान झालं. सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नसली तरी चालकाला गंभीर इजा झाली आहे. याला जबाबदार कोण..? असा संतप्त सवाल करत निकृष्ट कामाबाबतही चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

बरबडा येथील विकासासाठी आमदार पवार यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मेन रस्ता सिमेंट काँक्रीटचा, मधोमध डिव्हायडर आणि नाली बांधकामासाठी हा निधी खर्च करण्यात आला. परंतु झालेला रस्ता हा दर्जाहीन झाला. शिवाय डिव्हायडर तर कित्येकदा गळून पडले. आणि नाली बांधकाम हे देखील अतिशय निकृष्ट झाले आहे. कारण त्यावरून एखादी जड छोटी मोठी चार चाकी गाडी गेली तरी त्या नालीवरचे स्लॅब कोसळत आहे.

सध्या अनेक ठिकाणी स्लॅब कोसळून असे खड्डे पडले आहेत. परिणामी अशा खड्ड्यात एखादी गाडी अडकून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बुधवारी रात्री बाहेरगावचा पाहुणा नातलगांच्या कार्यक्रमानिमित्त गावात आला असताना त्यांना या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी थेट खड्ड्यात अडकली. यात एक छोटा बालक आणि तो पाहुणा हे दोघेही जखमी झाले. गाडीचही मोठ नुकसान झालं. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात मोठा अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण..?? असा संतप्त सवाल आता निर्माण होत असून, स्थानिक नागरिकांकडून निकृष्ट दर्जाच्या झालेल्या या बांधकामाबाबत संताप व्यक्त करत आमदार राजेश पवार यांनी संबंधित गुत्तेदाराला खडे बोल सुनावून दर्जाहीन कामाची सुधारणा करून देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

याआधी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे या नाली वरचे स्लॅब फुटले होते.गाजावाजा होऊ नये यासाठी अवघ्या दोन-चार तासांमध्ये थातूरमातूर सिमेंट फिरवून हा खड्डा बुजवण्यात आला. आता अजूनही तशीच परिस्थिती आहे. डिव्हायडर तर उकळले आहेत परंतु नाली वरचे स्लॅबही काही ठिकाणी तुटले आहेत. त्यामुळे झालेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता हे आता स्पष्ट झाले आहे. नाल्याचे बांधकाम इतक्या कमी कालावधीत खराब होणे म्हणजे ठेकेदाराकडून निष्काळजीपणाचाच पुरावा आहे. रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे बुधवारी दुचाकी अडकली मात्र भविष्यात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे त्वरित याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून नायगाव मतदारसंघाचा विकास केला. मात्र काही ठिकाणी झालेलं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने एवढा विकास करूनही आमदार राजेश पवार यांच्या कार्य शैलीला बट्टा लावण्याच काम काही कंत्राटदाराकडून होताना दिसून येत आहे. सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून बरबडा गावातील अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करण्यात आला. महावितरणचे रस्त्यात आलेले पोल न काढता संबंधित गुत्तेदाराने हे काम तसेच एखाद्या नक्षीकामाप्रमाणे बनवले.
महावितरणच्या पोल बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वी विचारले असता त्यांनी आम्ही पत्र व्यवहार केला असून काही दिवसात हे पोल बाजूला हलवले जातील असे स्पष्ट केले होते मात्र अजूनही हे काम झाले नाही. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यालाही आता भेगा पडायला सुरुवात झाली आहे. रस्त्या सोबत मधोमध डिव्हायडर बनवण्यात आले. हे डिव्हायडर अतिशय हलक्या दर्जाचे आहेत. एखादा धक्का जरी लागला तरी हे सिमेंटचे उभे केलेले डिव्हायडर पडत आहेत. या रस्त्याच काम होताना सार्वजनिक बांधकाम विभागाला याची कल्पना नसावी का.? अतिशय बकाल काम होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे हे आता स्पष्ट झाले आहे.



