‘बाबासाहेबांच्या सहीचा’ जागर आता बिलोलीत ; कडूबाई खरात यांच्या उपस्थितीत रंगणार जयंती महोत्सव!

प्रकाश महिपाळे
नांदेड : येथील आंबेडकर नगर भागातील नवयुवक भीम जयंती मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि तथागत भगवान बुद्ध यांच्या २५७० व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम असणार आहे.
हा सोहळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, बिलोली येथे संपन्न होणार आहे. जगाला शांततेचा संदेश देणारे महामानव आणि संविधानाचे निर्माते यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या भव्य कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन बिलोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकर चळवळीचे अभ्यासक मा.सुरेशदादा गायकवाड आपले विचार मांडतील, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहशिक्षक मा.एल.एम.जाधव हे असतील. स्वागत अध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक व ज्येष्ठ पत्रकार मा.प्रकाश मरीबा पोवाडे काम पाहणार आहेत.
याप्रसंगी बिलोलीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने अनुपदादा अंकुशकर, सौ.आम्रपाली पोवाडे, सौ.अनुपमा गायकवाड, विना संजय जाधव यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्यही उपस्थित राहतील.
’तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांनी घराघरात पोहोचलेल्या कडूबाई खरात यांचा पहाडी आवाज या निमित्ताने बिलोलीकरांना अनुभवता येणार आहे. त्यांच्या बुद्ध व भीमगीतांच्या कार्यक्रमाने या जयंती उत्सवात एक वेगळीच रंगत येणार आहे.
या सोहळ्याचे आयोजन नवयुवक भीम जयंती मंडळ, आंबेडकर नगर, बिलोली यांच्या वतीने करण्यात आले असून, अध्यक्ष हंसराज पोवाडे, उपाध्यक्ष विकास जाधव, सचिव रमेश पोवाडे, सहसचिव आशिष जाधव व संघटक प्रशांत पोवाडे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाला सर्व आंबेडकर अनुयायांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.



