माहूरगडावर बरबड्याच्या कलाकारांचा सांस्कृतिक कलाविष्कार…

भगवान शेवाळे
नांदेड :- साडेतीन शक्तिपीठांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर गडावर काल रविवार (दि.28) रोजी रेणुका मातेच्या चरणी शारदीय नवरात्र महोत्सवात बरबडा येथील कलाकारांनी सांस्कृतिक कलाविष्कार सादर केला. यात अभंग, भक्तिगीते, गोंधळ एका पेक्षा एक सरस गीते गाऊन उपस्थित रसिकांची दाद मिळवली.

माहूरगड येथे नवरात्रोत्सवादरम्यान विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर केले जातात, ज्यात गायन, वादन, नृत्य आणि कविसंमेलन यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश असतो. महाराष्ट्रातील हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ असून, या काळात महाराष्ट्रातील विविध कलावंत आपली कला सादर करण्यासाठी येतात. नवरात्रोत्सवात नऊ दिवस या ठिकाणी सांस्कृतिक कलाविष्काराचा कार्यक्रम सादर केला जातो. सकाळी सनई वादनाने या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि दिवसभर या कार्यक्रमाची रेलचेल असते. यंदा नायगाव तालुक्यातील बरबडा येथील कलावंताने देखील माहूर गडावर आपली संगीत सेवा दिली.

प्रारंभी तुझं मागतो मी आता या गीताने सलोनी सुक्ते यांनी सुरुवात करत वातावरण भक्तिमय केले. नाम गाऊ नाम गाऊ नाम विठोबाला वाहू, अलौकिक दत्तात्रेय अवतार या संतोष गुरुजी पचलिंग यांनी गायलेल्या गीतांनी उपस्थित भक्त मंडळींची मने जिंकली. अंबाबाई लाड लाड ये ग या गोंधळी गीताने सौ.प्रेमला शेवाळे व कृतार्थ करण्या जन्म आपुला या शिवाजी गुरुजी शेवाळे यांनी गायलेल्या गीताने उपस्थितांची दाद मिळवली.
महिषासुर मर्दिनी स्त्रोत स्वरांजली जाधव हिने गायले. शेवटी हलगी वाजती हे अजय शेवाळे यांनी गायलेल्या गीतावर सर्वांनी ठेका धरला. यात अजून भर ढोलकीवर असलेल्या समाधान राऊत आणि तबल्यावर असलेल्या परमानंद जाधव यांनी घातली. या गीताच्या जबरदस्त जुगलबंदीने उपस्थित भक्तांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
या संगीत सेवेत प्रसिद्ध गायिका सलोनी सुक्ते, गायक संतोष गुरुजी पचलिंग, शिवाजी गुरुजी शेवाळे, स्वरांजली जाधव, सौ.प्रेमला शेवाळे, कीबोर्ड वर साथ अजय शेवाळे, तबला साथ परमानंद जाधव, ढोलकी समाधान राऊत, पखवाज व्यंकटी शेवाळे, टाळ भगवान शेवाळे आदींनी संगीत सेवा केली तर यावेळी श्रीमती पुष्पा करंजे, सौ.द्वारका कुंभारगावे, सौ रेखा पचलिंग, सौ.छाया शेवाळे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच उत्कृष्ट सूत्रसंचलन दीपा यमुनवार यांनी केले. शेवटी रेणुका माता मंदिर संस्थानचे पुजारी चंद्रकांत भोपी यांनी संस्थांनच्या वतीने सर्व कलाकारांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.



