ताज्या बातम्यानांदेडनायगांव

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचे धागेदोरे नायगाव तालुक्यातील बरबड्यात ?

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव तालुक्यासह जिल्हाभरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारी एक टोळी असून या टोळीचा म्होरक्या तालुक्यातील बरबडा येथीलच असल्याची आता दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. या म्होरक्याने बोगस प्रमाणपत्राच्या माध्यमातून अमाप माया कमवली आहे. त्यामुळे या म्होरक्याच्या मुसक्या आवळण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदल्यामध्ये संवर्ग एक चा लाभ घेण्यासाठी शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतला त्यामुळे याचा राज्यभर बोभाटा झाला. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने चौकशीचे आदेश दिले. चौकशीत एका शिक्षण विभागात जवळपास 700 बोगस दिव्यांग निघाले. यावरून जिल्ह्यात एकच खळबळ तर उडालीच पण एका शिक्षण विभागात एवढे दिव्यांग असतील तर जिल्ह्यात किती बोगस दिव्यांग असतील याची चर्चा आता जोर धरु लागली आहे.

जिल्ह्यातील बोगस दिव्यांग शिक्षकात नायगाव तालुक्यातील 33 शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतला आहे. विशेषत: दररोज मोटारसायकल व कारमध्ये फिरणारे अनेक शिक्षक दिव्यांग असल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. धडधाकट असलेल्या ‘गुरुजीं’ना दिव्यांग कुणी बनवले याची चर्चा जिल्ह्यात सुरु झाली. यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारी एक टोळी असून या टोळीचा म्होरक्या नायगाव तालुक्यातील बरबडा येथील असल्याची माहिती समोर आली.

शासकीय सेवेत असलेल्या या म्होरक्याने शेकडोंनी बोगस प्रमाणत्र मिळवून दिले आहेत. ज्यांच्या ज्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्र आहेत त्या प्रत्येकाच्या संपर्कात तो म्होरक्या आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक बदलीमध्ये बोगस दिव्यांगाचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्याचे धाबे दणाणले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन बोगस प्रमाणपत्रात प्रचंड माया कमवली असून या संपदेचीही आता चर्चा सुरु झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker