खुन करुन प्रेत पोत्यात बांधून नाल्यात फेकले : बिलोली तालुक्यातील बेळकोणी येथील घटना

सतीश बळवंतकर
बिलोली : तालुक्यातील बेळकोणी बु. येथील 45 वर्षीय कामगाराचा खुन करुन प्रेत पोत्यात बांधून गावच्या शेजारी असलेल्या नाल्यात फेकून देण्यात आल्याची घटना दि. 16 रोजी उघडकीस आली. या खुनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून. रामतीर्थ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. संशयित आरोपीला पकडण्यासाठी पथक विविध ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.
बिलोली तालुक्यातील कासराळीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बेळकोणी बुद्रुक येथील शंकर बालन मोंडेवाड यांचे बेळकोणी हे त्यांचे जन्मगाव असून त्यांची आई या ठिकाणी वास्तव्यास आहे तर ते स्वतः तेलंगणात कामगार म्हणून काम करत बुधवारी ते मित्रांसोबत घरी झोपले. गुरुवारी दि. 16 रोजी दुपारी 11 वाजताच्या दरम्यान गावाशेजारी नाल्यात मोठे पोत्याचे गाठोडे दिसून आले. याबाबत संशय आल्याने गावातील काही नागरिकांनी गाठोडे सोडून पाहिले तर त्यात प्रेत दिसून आले. सदरची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. पोलिसांना रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हराळे, पोलीस उपनिरीक्षक नरवाडे बीट जमादार सुर्यवंशी घटनास्थळी दाखल झाले. त्याबरोबरच बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनीही घटनास्थळ गाठले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वान पथकास पाचरण करण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मयताच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त करत आरोपीचा शोध घेण्याची मागणी केली. बुधवारी रात्री मयत शंकर व त्याचे मित्र सोबत होते. अचानकपणे दुसऱ्या दिवशी शंकरचा मृतदेह बांधून नाल्यात फेकल्याच्या आढळून आल्यामुळे मित्राने मित्राचा खून केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी चार पथकांच्या माध्यमातून घटनेचा शोध घेणे सुरू केले आहे. पथक उमरी धर्माबाद व तेलंगणात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.



