मलकापूर शिवारात प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर कुंडलवाडी पोलिसांची मोठी कारवाई
◆३ लाठ ८ हजारांचा मुद्देमाल जप्त,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल ◆दुचाकी व मोबाईलसह विविध प्रतिबंधित गुटखा ताब्यात

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्यास हानिकारक म्हणून प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना कुंडलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई १८ जुलै २०२६ रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास कुंडलवाडी हद्दीतील मलकापूर शिवारात हनुमान मंदिराजवळ करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गुटख्यासह दोन स्कूटी आणि मोबाईल असा एकूण ३,०८,५७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद आनजफ मोहम्मद आजम (वय २६, रा. मदिना मशीद जवळ, नायगाव) आणि सय्यद जुबेर सय्यद करीम (वय २९, रा. पानसरे नगर, नायगाव) या दोन गुटखा विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.आरोपींनी आपसात संगनमत करून पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये विविध कंपन्यांचा (आर.एम.डी., व्ही-१, विमल, राजनिवास, सागर, एस.आर.-०१, झेड-एल-०१) प्रतिबंधित गुटखा भरला होता. हा साठा ते स्कूटीवरून विनापरवाना व बेकायदेशीररित्या वाहतूक करत असताना कुंडलवाडी पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.
या कारवाईत ६८,५७९ रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा,१ लाख रुपये किमतीची सुझुकी बर्गमन कंपनीची पांढऱ्या रंगाची स्कूटी (MH-26-CT-2622).१ लाख रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा कंपनीची पांढऱ्या रंगाची स्कूटी (MH-26-DC-1246).३० हजार रुपये किमतीचा एक आयफोन-१६ मोबाईल.१० हजार रुपये किमतीचा एक विवो व्ही-३ मोबाईल.असा एकूण ३,०८,५७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या विविध कलमान्वये कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ८५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), आणि धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी, पोलीस अंमलदार सुनील दस्तके, आनंद बोडके आणि रघुवीर चव्हाण यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे हे करीत आहे.



