ताज्या बातम्यानांदेडनायगांव

सगरोळी वाळू घाटावरील कारवाईने महसूल व पोलीस यंत्रणेचे पितळ उघडे : तहसीलदार व पोलीस निरिक्षकावर होणार कारवाई?

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : बिलोली तालुक्यात सगरोळी वाळू घाटात सुरु असलेल्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी धाडसी कारवाई करत 8 जेसीबीसह 36 हायवा ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाईमुळे खळबळ तर उडालीच आहे पण या सर्व नियमबाह्य प्रकाराला उघड उघड पाठींबा देणारे बिलोली उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदार व पोलीस निरिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे.

बिलोली तालुक्यातील सगरोळी वाळू घाटातून 2485 ब्रास वाळू उत्खनन करण्याची कायदेशीर परवानगी होती. मात्र मागच्या दोन महिण्यापासून सर्वच नियम धाब्यावर बसवून दररोज हजारो ब्रास वाळूचे उत्खखन करण्यात येत आहे. होणाऱ्या वाळू घाटाच्या अवैध उत्खननाबद्दल अनेक तक्रारी झाल्या तरी जिल्हाधिकारी कार्यालय व बिलोली महसूल विभाग काहीही कारवाई करण्यास तयार नाही.

उलट तक्रारदाराला बदनाम करण्याची मोहीम घेण्यात येते. ज्या ठिकाणी नियमबाह्य काम चालते त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला कारवाई करण्याचे अधिकार असतांना बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भोसले यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेत असून दुसऱ्यांदा बिलोली पोलीस ठाण्याचा कारभार घेतल्यानंतर पुन्हा वाळूच्या धंद्याची जोमाने वसूली होत आहे.

सगरोळी घाटातून दिवसरात्र व नियमबाह्य वाळूचा उपसा होत असतात उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे व बिलोलीचे पोलीस निरिक्षक भोसले हे फक्त मलिद्याकडेच लक्ष देत होते. त्यामुळे या नियमबाह्य वाळू उपसा प्रकरणात पोलीस उपमहानिरीक्षकांनी लक्ष घातले व त्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी नियमबाह्य वाळूचे उत्खनन व वाहतूक करणारे 8 जेसीबी व 36 हायवा ताब्यात घेतल्या.

या धाडसी कारवाईमुळे बिलोली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार संजय जिंकलवाड, कामाजी गवळी, प्रदीप खानसुळे, गणेश धुमाळ अदींचा समावेश होता.

बिलोली तालुक्यातील वाळू घाटातून मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्याने महसूल व पोलीस विभागातील अधिकारी मांजरा नदी चक्क माफीयांना आंदन दिली असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास करत व सर्व नियम फाट्यावर मारुन वाळूचे बिनधास्तपणे उत्खनन करुन वाहतूक करण्यात येत आहे.

एकाच पावतीवर दोन दोन फेऱ्या…
महसूल अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सकाळी लातूर सोलापूरला निघालेली वाळूची हायवा संध्याकाळपर्यंत नायगाव बिलोली तालुक्यातच फिरत असते आणि दोनदा वाळू खाली करुन येते. लांब पल्याचा प्रवास दाखवून तालुक्यातच वाळू विक्री करण्यात येत आहे.

बिलोली तालुक्यातील गंजगाव व सगरोळी येथील वाळू घाटातून सुरु असलेल्या नियमबाह्य वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे महसूल व पोलीस यंत्रणेच्या भ्रष्ट कारभाराची संबंध जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker