ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव पंचायत समितीच्या आणखी दोन आँपरेटरची हकालपट्टी : मेघना कावली यांची धाडसी कारवाई

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतले असल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दि. २९ रोजी ९ ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना तडकाफडकी कार्यमुक्त केल्यानंतर दि. ३० रोजी नायगाव पंचायत समितीच्या आणखी दोन डाटा एंट्री आँपरेटरला कार्यमुक्त केले आहे.

नायगाव पंचायत समितीवर प्रशासकराज असल्याने पंचायत समिती भ्रष्टाचाराची बजबजपुरी बनली आहे. त्यामुळे घरकुलासह अन्य योजनेच्या लाभार्थ्यांची प्रचंड लुट करण्यात येत आहे. विशेषतः घरकुलाचे देयके अदा करण्यासाठी कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंते कुठल्याही थराला जात असून. ज्या गावात घरकुलाचे कामे आहेत त्या गावच्या सरपंचाला सुध्दा थांगपत्ता लागू देत नाहीत अशा पध्दतीने लाभार्थ्यांकडून पैसे उकळत होते. या प्रकाराचा प्रचंड गवगवा झाल्यावर आमदार राजेश पवार यांना जाग आली व त्यांनी झाडाझडती घेत पैसे घेतले असल्याचे कबूल करायला लावले तसा व्हिडीओ व्हायरल झाला.

आमदारांनी घेतलेली झाडाझडती व व्हायरल व्हिडीओची दखल घेवून दि. २९ आक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी अर्जुन प्रभाकरराव जाधव, शेख समिर, ओमप्रकाश विश्वनाथ पांडागळे, सुजित शिवराम दाताळकर, धोंडीबा मारोती उपासे, आडे संतोष किशन, ऋषिकेश नामदेव सरादे, मोहम्मद इब्राहिम, संतोष माधवराव वडजे अदि 9 ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना ग्रामीण गृहनिर्माण अभियंता या पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. तडकाफडकी आणि एकाच वेळी ९ ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना कार्यमुक्त केले. त्यानंतर हे प्रकरण शांत होईल असे वाटत होते. मात्र पुन्हा दि. ३० आक्टोबर रोजी सायंकाळी भाग्यराज पाटील व आम्रपाली शिरडे या दोन डाटा एंट्री आँपरेटरला कार्यमुक्त करण्यात आल्याचे आदेश धडकले.

दोन दिवसातील जिल्हा परिषदेच्या कारवाईमुळे घरकुल योजनेतील सर्वच कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त झाले आहेत. सर्वच कर्मचारी कार्यमुक्त झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांच्या देयके अदा करण्याच्या कामाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गटविकास अधिकारी रजेवर…
भ्रष्ट गटविकास अधिकारी म्हणून परिचित असलेले नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखडे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याचे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता दिसताच दिर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे तात्पुरता पदभार ढवळे यांना देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker