निवडणूक जिंकण्याची धमक असलेल्या व्यक्तिमत्त्वाने भाजपकडे मागितली उमेदवारी

प्रकाश महिपाळे
नायगाव : अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या नरसी जिल्हा परिषद गटात निवडणूक लढवण्यासाठी जनसंपर्क वाढवून मोर्चेबांधणी करणारे प्रो डॉ.मनोहर तोटरे यांनी पत्नी सौ.तृष्णा मनोहर तोटरे यांच्यासाठी भाजपकडे उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे. तोटरे यांच्या निमित्ताने भाजपला एक दमदार उमेदवार मिळणार असल्याने आतापासूनच त्यांच्या विजयाचे गणित मांडण्यात येत आहे.
नायगाव तालुक्यातील नरसी जिल्हा परिषद गट २००२ साली अस्तित्वात आल्यानंतर यावेळी होणारी ही पाचवी निवडणूक आहे. पहील्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या सौ.सरोज संजय शेळगावकर यांनी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती होत्या. शिवराज होटाळकर यांनी दुसरी निवडणूक जिंकल्यावर शिक्षण सभापती झाले होते. तिसऱ्यांदा सौ.मनिषा नागेश्वर तर चौथी निवडणूक भाजपचे माणिकराव लोहगावे यांनी जिंकली होती.
मागील दहा वर्षांपासून नरसी जिल्हा परिषद गटावर भाजपचे वर्चस्व असून यंदाही भाजप उमेदवार विजयी होण्याची आतापासूनच शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेळगाव गौरीचे सरपंच तथा मुखेड येथील शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयातील प्रोफेसर असलेले डॉ. मनोहर तोटरे यांनी आपल्या सौभाग्यवती तृष्णा यांच्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
तोटरे यांनी मागच्या काही दिवसापासून जिल्हा परिषद गटात मतदारांशी संवाद साधून आपला मनोदय व्यक्त केला व आ.राजेश पवार यांनी उमेदवारी दिली तर निवडणूक ताकदीने लढवू असे नम्रपणे सांगत आहेत. शेळगाव गौरीचा नजरेत भरणारा केलेला विकास आणि सृजनशील व्यक्तीमत्व म्हणून परिचित असलेले डॉ.मनोहर तोटरे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी करत असल्याने त्यांना मतदारांचा चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.



