गणपत धानेकर यांचे अपघाती दुःखद निधन अंजणी व शंकरनगर परिसरात शोककळा

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड देगलूर राज्य महामार्गावर नरसी जवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अज्ञात वाहनाची मोटार सायकल ला धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले कै.मधुकरराव पाटील खतगावकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शंकरनगर तालुका बिलोली येथील सेवक गणपत गंगाराम धानेकर वय ५२ यांचे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अंजणी व शंकरनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
गणपत धानेकर हे शंकरनगर येथील महाविद्यालयात सेवक पदावर कार्यरत होते. ते मनमिळावू व आदराने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वत्र परिचित होते. दि.२१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी नायगावहून शंकरनगरकडे येत असताना नरसी शहरातील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक देऊन गेल्याने झालेल्या या अपघातात अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मावळली असून त्यांच्या पार्थिवावर दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता अंजणी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
धानेकर यांच्या निधनाने महाविद्यालय तसेच परिसरातील एक प्रेमळ, विनम्र सहकारी गमावल्याची भावना प्राचार्य शिवाजीराव पाटोदे, माजी मुख्यध्यपिका कल्पनाताई पाटील यांनी व्यक्त केले. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.



