तालुक्यातील १९ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित : तरीही आमदारांचे बळीराजाकडे दुर्लक्ष

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तहसील व पंचायत समितीच्या कार्यालयात स्टंटबाजी करणारे आमदार राजेश पवार आँगष्ट आणि सप्टेंबर महिण्यातील अतिवृष्टीने तालुक्यातील ५६ शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले एकाही शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले नाहीत. आता नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड न केल्यान व फार्मर आयडी प्रलंबित असल्याने १९ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत तोंडावर बोट आणि कानावर हात ठेवून बसल्याने आ.पवार हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आणि भरघोस मताने राजेश पवार यांना एकदा नाही तर दोनदा आमदार केले पण ते शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक भुमिका घेतांना दिसत नाहीत. आँगष्ट आणि सप्टेंबर महिण्यात नायगाव तालुक्यातील अतिवृष्टीने पुर्ण खरिप हंगाम वाहून गेला त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला आहे. परिणामी जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा संकटात सापडला.
संकटात सापडलेल्या बळीराजाला लोकप्रतिनिधी या नात्याने त्याच्या पाठीवर हात ठेवून जगण्याचे बळ देणे आवश्यक असताना त्या संकटाच्या काळात आ. राजेश पवार हे गायब होते. तब्बल ३५ दिवस मतदारसंघात पाय ठेवला नाही. पालकमंत्री आले खासदार शेताच्या बांधावर जावून शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले पण आ. मात्र फिरकले देखील नाहीत.
शेताच्या बांधावर न फिरकणारे आ. पवार यांनी मात्र दोन दिवस पंचायत समिती व तहसील कार्यालयात स्टंटबाजी केली. त्यांच्यामुळे ११ कंत्राटी कर्मचारी घरी गेले. यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी घरकुलधारकांचे प्रश्न वाढण्याची शक्यता आहे. काय करावे आणि काय करु नये हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असला तरी काहींना आमदारांची कृती योग्य वाटते व त्यांच्या धाडसाचे कौतुकही करत आहेत तर काहीजन आमदार जाणीवपूर्वक स्टंटबाजी केली असल्याचा आरोपही करत आहेत. तहसील व पंचायत समितीमधील या गोंधळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याकडे कुणाचेच लक्ष नाही.
आँगष्ट सप्टेंबर महिण्यात नायगाव तालुक्यातील तब्बल ५६ हजार ५५० शेतकऱ्यांचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले. त्यापैकी अद्यापही यातील १३ हजार ८६३ शेतकऱ्यांच्या याद्याच शासनाच्या साईटवर अपलोड झाल्या नाहीत. दुसरीकडे फार्मर आय डी साठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली परंतु अप्रुवल देण्यात आले नसल्याने ५ हजार ४०० फार्मर आय डी प्रलंबित आहेत. या दोन्ही घटनेमुळे तालुक्यातील १९ हजार शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली.
नायगाव तालुक्यातील तब्बल १९ हजार शेतकरी तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे दिवाळी संपली तरी अनुदान मिळाले नाही या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी कार्यसम्राट आ.राजेश पवार तोंडावर बोट व कानावर हात ठेवून बसले आहेत. एकीकडे आमदार शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत कमालीचे दुर्लक्ष करत आहेत तर दुसरीकडे पत्नीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी बरबडा व करखेली जिल्हा परिषद गटात जोरदार बँनरबाजी करत आहेत हे विशेष.



