कंत्राटदार मनोज पाटील मोरे यांचा भाजपमध्ये प्रवेश…
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बरबडा गटात राजकीय हालचाली...

भगवान शेवाळे
बरबडा :- नायगाव तालुक्यातील बरबडा जिल्हा परिषद सर्कल मध्ये आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय हालचाली होताना दिसून येत आहेत. अनेक इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा दावा केला असला तरी, रविवारी रात्री उशिरा या भागातील कंत्राटदार असलेले मनोज पाटील मोरे यांनी भाजप प्रवेश केला आहे.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू असलेले स्वर्गीय रावसाहेब पाटील मोरे यांचे चिरंजीव कंत्राटदार मनोज रावसाहेब पाटील मोरे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह काल रविवारी रात्री उशिरा शंकरराव चव्हाण मेमोरियल याठिकाणी माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, आमदार राजेश पवार यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने बरबडा जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठे राजकीय फेरबदल म्हणावे लागतील.

कारण, या भागातील भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या पत्नी, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.पूनमताई पवार ह्या या गटातून निवडणूक लढवतील असा कयास लावला जात होता. मात्र मनोज पाटील मोरे यांच्या भाजप पक्षप्रवेशाने ते आता त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून या गटातून निवडणूक लढवतील अशी शक्यता बळावली आहे. प्रवेशानंतर ते याबाबत जाहीर करतीलही मात्र सौ.पुनमताई पवार हा गट सोडून अन्य ठिकाणहून निवडणूक लढवतील आणि जिल्हा भाजप या गटातील एक जागा मनोज पाटील मोरे यांच्या माध्यमातून वाढवतील अशा नव्या मार्गाचे प्रयत्न केले जात असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
कंत्राटदार मनोज पाटील मोरेंच्या रूपाने या गटात एक वजनदार चेहरा या निमित्ताने भाजपला मिळाला असून, त्यांचे वडील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष स्व.रावसाहेब पाटील मोरे हे तत्कालीन काँग्रेस पक्षकार्यकाळात जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर राहिले आहेत. गावोगावी त्यांचा मोठा जनसंपर्क होता. अनेक गावात त्यांचे आजही नातेवाईक संबंध आहेत.
विशेष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर असलेला त्यांचा दृढ विश्वास ही एक जमेची बाजू त्यांची असली तरी त्यांच्याच नात्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गावोगावी त्यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. निवडणुकीसाठी त्यांचीही जोरदार तयारी सुरू आहे.
काँग्रेसकडून भास्करराव धर्माधिकारी हे देखील दंड थोपटून तयार आहेत. पक्षनिष्ठा यासोबत त्यांचा प्रामाणिकपणा घेऊन ते जनतेसमोर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीकडून घुंगराळा येथील उपसरपंच वसंत सुगावे पाटील हे देखील या गटात इच्छुक आहेत. पक्षाकडे उमेदवारीसाठी ते जोर लावताना दिसून येत आहेत. शिवाय गावागावातील लोकांना एकत्र जमवून त्यांच्या सोबत बैठका घेत आहेत. अनेक जण इच्छुक जरी असले तरी शेवटपर्यंत या मैदानात कोण टिकेल आणि कोण माघार घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मागील 35 वर्षानंतर स्थानिक बरबड्यातील चेहरे जिल्हा परिषदेवर नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत. या चेहऱ्यांचा मतदारावर नेमका किती प्रभाव पडेल..?? जनभावना नेमकी कुणाकडे कल देईल..? हे आगामी होऊ घातलेल्या निवडणुकातून समोर येईलच. तोपर्यंत अजून कोणकोणते नवीन राजकीय डावपेच समोर येतील हे पाहण्यासाठी या भागातील जनता उत्सुक आहे.



