शंकरनगर महाविद्यालय परीक्षा केंद्रास प्रा.कुलगुरु डॉ अशोक महाजन यांची भेट

मोरे मनोहर
किनाळा :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू श्रीमान डॉ.अशोक महाजन यांनी शंकरनगर तालुका बिलोली येथील श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रास दिनांक 21 नोव्हेंबर रोजी अकस्मिक भेट दिली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या हिवाळी२०२५ परीक्षा दिनांक 11 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या असुन या परीक्षेत कसलाच गैरप्रकार होऊ नये यासाठी विद्यापीठाने केंद्रप्रमुख,सह केंद्रप्रमुख, तसेच अनेक दक्षता पथके गठीत केली आहेत. त्या व्यतिरिक्त सुद्धा परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासकीय अधिकारीही परीक्षा केंद्रांना अकस्मिक भेटी देत आहेत.
त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, तसेच प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन, तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य अनेक ठिकाणी आपल्या अकस्मिक भेटी देत असुन ते दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दहा ते बाराच्या दरम्यानच्या पेपरला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रा.कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी शंकरनगर येथील मधुकर पाटील खतगावकर महाविद्यालयास अकस्मिक भेट दिले.
येथील परीक्षा केंद्रावर एकूण 171 विद्यार्थी परीक्षा देत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य हेमंत बक्षी, डॉ.शिवाजीराव पाटोदे, डॉ.दिलीप जामकर, डॉ.सुनील कदम, डॉ.दयानंद माने, डॉ.संभाजी कबाडी, डॉ.राजेंद्र शिंदे तसेच परीक्षा विभागाचे डॉ.सुरेश धनवडे, डॉ शंकर लेखणे, डॉ पुरभाजी भुमरे उपस्थित होते. प्रा.कुलगुरू यांनी परीक्षा सुरळीत पार पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.



