माहूर दुहेरी हत्याकांडातील दोन आरोपी जेरबंद : पोलीसांच्या जलदगती कारवाईचे कौतुक

New Bharat Times नेटवर्क
माहूर : तालुक्यातील पाचोंदा येथे काल दि. 20 रोजी शेतात कापूस वेचणीदरम्यान दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून निर्घृण खून झाल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली होती. या घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी जलदगतीने तपास मोहीम राबवत बारा तासात या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलीसांच्या जलदगती कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दुहेरी हत्याकांडात मृत झालेल्या अंतकलाबाई अशोक आढागळे आणि अनुसयाबाई साहेबराव आढागळे या दोघी पाचुंदा येथील असून त्या शेतात कापूस वेचत असताना गळा दाबून खून करण्यात आला होता. महिलांच्या गळ्यातील दागिने गायब झाल्याने घटना लूटमारीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे, पो.उप.निरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार असे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आरोपींचा किनवट व माहूर उपविभाग येथे शोध घेत होते.
तसेच संशयीत आरोपीचे स्केच वरुन आरोपीची माहिती घेत असतांना दिनांक 21.11.2025 रोजी श्री रवि वाहुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, संशयीत आरोपी नामे दत्ता सुरेश लिंगलवार, रा.सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ हा गंगाजी नगर, सेलु करंजी ता.माहुर जि.नांदेड येथील त्याचे नातेवाईकाच्या शेतातील अखाड्यावर लपुन बसला आहे.
खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदरची माहीती वरीष्ठांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहुळे, पो.उप.निरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार हे मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी जावुन सापळा लावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दत्ता सुरेश लिंगलवार वय 38 वर्ष व्यवसाय बेकार रा.सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ असे असल्याचे सांगितले.
त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र गजानन गंगाराम बेरजवार वय 41 वर्ष व्यवसाय सुतारकाम रा.गंगाजीनगर, करंर्जी ता.माहुर जि.नांदेड यांनी दोघांनी मिळून केल्याचे सांगितले. वरुन आरोपी दत्ता लिंगलवार यास दुसऱ्या आरोपी गजानन हा कोठे राहतो या बाबत विचारपुस केली असता त्यांनी गावाच्या खाली सगळयात शेवटी राहतो असे सांगुन त्याचे घरी घेवुन गेला असता दुसरा आरोपी गजानन येरजवार हा सुध्दा मिळुन आला त्यास विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असता त्यांनी गुन्हयात वापरलेली एक मोटार सायकल व दोन मोबाईल गुन्हयाचे तपास कामी ताब्यात घेण्यात आले.
दुहेरी हत्याकांडानंतर गावात तणाव व भीतीचे वातावरण कायम आहे. नागरिकांनी कडक शिक्षेसोबतच अशा घटना टाळण्यासाठी कठोर गस्त व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी जमली असून शोककळा पसरली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पुढील चौकशी सुरू असून गुन्ह्याचे नेमके कारण, कटात आणखी कोणी सामील होते का, दागिने कुठे विकले गेले याबाबत तपास सुरू आहे. पुढील काही दिवसांत महत्त्वाचे उलगडे होण्याची शक्यता आहे.



