जुगाराच्या गुन्ह्यात पोलीस कस्टडी पाहिजे नसेल तर दहा हजार दे म्हणणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद

प्रकाश महिपाळे
नायगाव : जुगाराच्या गुन्ह्यात पोलीस कस्टडी पाहिजे नसेल तर दहा हजार दे अशी मागणी करणारे रामतीर्थ पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक दशरथ खंडेराव जांभळीकर यांच्यासह अन्य एकाच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केल्याने रामतीर्थ पोलीस ठाण्यातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्यात दि. 21 नोव्हेंबर रोजी जुगाराचा गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणातील आरोपीला अटक करुन पोलीस कस्टडी न मागण्यासाठी बिट जमादार असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक दशरथ जांभळीकर यांनी मोठ्या रक्कमेची मागणी केली होती. तर पोलीसांचा पंटर असलेला खासगी इसम अमजद पठाण यांनी तक्रारदार यांना फोनवर सांगितले की, मला तीस हजार रुपये दिले असते, तर तुमचे सर्व गुन्हे मी अंगावर घेतले असते, मी जांभळीकर साहेबांना सांगतो तक्रारदार येत आहेत त्यांना पैसे देऊन टाका असे म्हणून लाच देण्यास प्रोत्साहन दिले.
या लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 22 नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे तक्रारदार यांच्यावर दाखल असलेल्या जुगाराच्या गुन्ह्यामध्ये पीसीआर न घेता, तपासात मदत करण्यासाठी लोकसेवक सहायक पोलीस उपनिरीक्षक जांभळीकर यांनी तक्रारदाराकडे शासकीय पंचासमक्ष 10 हजार लाचेची स्वतः मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्यास सहमती दिल्याचे, तसेच खाजगी इसम अमजद पठाण यांनी तक्रारदार यांना फोनवर जांभळीकर यांना लाच देण्याकरीता प्रोत्साहन दिल्याचे लाच मागणी पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले.
लाच मागणी सिध्द झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 23 व 24 नोव्हेंबर रोजी जांभळीकर यांच्यावर सापळा कारवाई करण्यासाठी तक्रारदार यांना पाठविले. परंतु जांभळीकर यांना तक्रारदाराचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकृती केली नाही. तरीही रामतीर्थ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 चे कलम 7, 7-अ, 12 अन्वये दि. 25 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जुगाराच्या गुन्ह्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सुचनेवरून जांभळीकर यांनी मोठी रक्कम मागणी केली होती. तडजोड अंती रक्कम देण्याचे आरोपीने मान्यही केले होते पण त्या अधिकाऱ्याने कमी रक्कम घेण्यास विरोध केला होता. त्यी हे प्रकरण घडल्याची ठाण्यातील कर्मचारी दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घ्यावी आणि सखोल चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



