कोठाळा येथे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतही गैरव्यवहार
पाच महिण्यापासून चौकशी करण्यास पंचायत समितीकडून टाळाटाळ

New Bharat Times नेटवर्क
नायगाव : तालुक्यातील कोठाळा येथे रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा तर करण्यात आलाच पण पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतही प्रचंड अर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाची पंचायत समिती मागच्या पाच महिण्यापासून चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याने या भ्रष्टाचाराला पंचायत समितीचे अधिकारीच खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अडथळे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला. थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर निधी वर्ग करुन गावच्या विकासाला चालणा देण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला. वित्त आयोगाच्या माध्यमातून गावात विकासाची कामे करण्यासाठी सरपंचानांच अधिकार बहाल केले. मात्र गावच्या कारभाऱ्यांनी मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करुन आलेला निधी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या संगणमताने घशात घालण्यात आल्याचा प्रकार तालुक्यातील कोठाळा येथे घडला आहे.
त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अंकुशकुमार देगावकर यांनी नायगाव पंचायत समितीकडे वस्तुनिष्ठ पुराव्यासह (ता. १८) जुन रोजी तक्रार दिली होती. यात कोठाळा ग्रामपंचायतने पंचायत समितीला सादर केलेल्या आराखड्यानुसार कामे केली नाहीत. मनमानी कारभार करुन निधी संपवण्यात आला आहे. मोठी रक्कम तर न दिसणाऱ्या कामावरच खर्च करण्यात आली त्यात पाणी पुरवठा, पाणी पुरवठा विषयक कामे, नालेसफाई, सांडपाणी घनकचरा, ब्लिचिंग पावडर खरेदी, स्वच्छतेविषयक कामे, दिवाबत्ती, महिला बचत गटांना प्रशिक्षण अशाच कामात निधी खर्च करण्यात आला असल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायतच्या आजुबाजूला जागा नसतानाही ग्रामपंचायतमध्ये शौचालय बांधकाम दाखवण्यात आले. त्याचबरोबर शौचालय दुरुस्ती, जि. प. शाळेला संरक्षक भिंत बांधणे, शाळेसाठी साहित्य व फर्निचर खरेदी, अंगणवाडी दुरुस्ती, अंगणवाडी शौचालय दुरुस्ती, अंगणवाडीला साहित्य खरेदी, समाज मंदिर दुरुस्ती, बंदिस्त नाले, सी सी रस्ते, दिव्यांगांना मदत यासह अनेक कामे केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे.
मात्र यातील अनेक कामे दोनदा दाखवण्यात आली. जी कामे केल्याचे दाखवतात आले त्यातील अनेक कामे बोगसच झाली असून काही कामे कागदावर आहेत तर न दिसणाऱ्या कामाचे फक्त बिले दाखवली असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
कोठाळा ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या संगणमताने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील बोगस व कागदोपत्री दाखवण्यात आलेल्या कामाची तीन सदस्यांची समिती गठीत करुन चौकशी करण्यात यावी व दोषी असलेल्या ग्रामपंचायतच्या कारभाऱ्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्यात यावेत अशी मागणी
नायगाव पंचायत समितीकडे (ता.१८) जुन २०२५ रोजी करण्यात आली होती. मात्र पंचायत समितीने मागच्या पाच महिण्यापासून चौकशी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याने या भ्रष्टाचाराला पंचायत समितीचेच अधिकारी खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे.



