आपले सेवा सरकार केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ८ डिसेंबर पासून नागपूर येथे आंदोलन

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : मागील १५ वर्षापासून आपल्याला सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत कार्यरत असलेले सर्व तालुका व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापकांना नियुक्ती अद्यापही नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी दि. ८ डिसेंबर पासून नागपूर येथे बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील सर्व तालुका व्यवस्थापकव जिल्हा व्यवस्थापक हे मागील १५ वर्षापासून ग्रामविकास विभागाचा संग्राम व आपले सरकार सेवा केंद्र या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून काम करीत आहेत. त्यांना या कामाचा दीर्घ काळ अनुभव असून ते उत्तम प्रकारे व्यवस्थापन व तांत्रिक काम सांभाळत आहेत. त्यासोबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार पंचायती राज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेले सर्व कामकाज संगणकीकृत करून एकसूत्रता व पारदर्शकता ठेवणे.
केंद्र व राज्य पुरस्कृत सर्व योजना ग्रामीण पातळीवर राबविणे, तसेच नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत आवश्यक असलेले सेवा दाखले जन्म-मृत्यू, विवाह नोंद तसेच ग्रामपंचायत अनुषंगिक १ ते ३३ नमुने, इतर व्यावसायिक सेवा, जास्तीत जास्त प्रकारच्या बँकिंग सेवा इत्यादी सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच कालबद्ध स्वरुपात देण्यात येत होत्या.
आपले सरकार प्रकल्पासाठी शासनाने सप्टेंबर २०२४ मध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड व आई टी आई लिमिटेड च्या माध्यमातून मनुष्यबळ भरण्यासाठी अँकसेंट टेक्नॉलॉजी सर्विसेस या कंपनीची निवड करण्यात आली. परंतु या कंपनीची मुदत सप्टेंबर २०२५ रोजी संपली आहे. शासनाने अद्याप पर्यंत आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प संचलनासाठी कुठलेही पाउल उचलले नाही किंवा ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व पंचायत समित्या व जिल्हा परिषद मध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पामध्ये काम करणारे तांत्रिक मनुष्य बळ म्हणजे तालुका व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावलेली आहे.
तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापकांनी मागील १५ वर्षापासून या प्रकल्पावर काम करीत असल्याने एैन उमेदीत वयाचे १४ ते १५ वर्ष या प्रकल्पात घालवले. आता त्यांची वयोमर्यादा देखील ३९ वर्षे ते ५० वर्षे इतकी झालेली आहे. प्रत्येक वेळी जुन्या कंपनीची मुदत संपल्यावर तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक यांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ किंवा चालढकल पणा केला जातो. यापूर्वी देखील ग्रामविकास विभागाकडे याबाबतचा पाठपुरावा आमच्या संघटनेच्या मार्फत वेळोवेळी करण्यात आला आहे परंतु याचे समाधानकारक निर्णय किंवा उत्तर आम्हास अद्याप मिळालेले नाही.
त्यामुळे सर्व तालुका व्यवस्थापक, जिल्हा व्यवस्थापक असे सर्व एकत्रितपणे या पत्राद्वारे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर दि.८ डिसेंबर २०२५ रोजी सोमवार सकाळी ११ पासून बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.



