धर्माबाद–बिलोली नगरपालिकेच्या निकालानंतर भाजपामध्येच संभ्रम : भाजपाच भाजपाविरुद्ध लढली का
माणिक चव्हाण तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस यांचा प्रश्न
New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- काल पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धर्माबाद नगरपालिकेत मराठवाडा जनता विकास पॅनल आणि बिलोली नगरपालिकेत मराठवाडा जनता पॅनल यांनी नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवत विजय संपादन केला. या निकालांनंतर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावत जोरदार प्रचार यंत्रणा राबवली. भाजपाचे अधिकृत उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, असा दावा करण्यात आला होता. मात्र निकालानंतर घडलेल्या घडामोडींमुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे.
याला कारण ठरली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी दिलेली अलीकडील मुलाखत. या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले की धर्माबाद आणि बिलोली येथे निवडून आलेले अपक्ष नगरसेवक व नगराध्यक्ष हे प्रत्यक्षात भाजपाच्याच पाठिंब्याने निवडून आलेले उमेदवार आहेत. या विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
जर अपक्ष म्हणून निवडून आलेले उमेदवार भाजपाचेच मानले जात असतील, तर मग भाजपाच्या अधिकृत चिन्हावर उभे राहिलेले उमेदवार नेमके कोणासाठी होते? भाजपाने दोन वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून एकाच निवडणुकीत परस्परविरोधी भूमिका घेतली का? भाजपाच भाजपाविरुद्ध लढली का, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.
विशेषतः धर्माबाद शहरात अशी जोरदार चर्चा आहे की अशोकराव चव्हाण यांनी स्वतःचे स्वतंत्र पॅनल उभे करून भाजपाच्या मूळ व निष्ठावान कार्यकर्त्यांना राजकीयदृष्ट्या बाजूला सारले का की मग आमदार राजेश पवार यांनी प्रतिष्ठेची लढाई असल्याचे सांगत प्रत्यक्षात अशोकराव चव्हाण यांच्या अपक्ष पॅनलला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला? या संपूर्ण घडामोडींमुळे भाजपासाठी अहोरात्र काम करणाऱ्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र अस्वस्थता आहे. “आम्हाला केवळ सतरंज उचलण्यासाठी वापरले गेले का?” असा प्रश्न आता खुलेआम विचारला जात आहे.
अशोकराव चव्हाण यांनी मुलाखतीत अपक्ष उमेदवारांना भाजपाचेच पुरस्कार असल्याचे जाहीरपणे सांगितल्यानंतर, धर्माबादमधील भाजपाच्या अधिकृत उमेदवारांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांना उमेदवारी खरोखर जिंकण्यासाठी दिली होती की केवळ राजकीय डावपेच म्हणून, हा प्रश्न शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
एकूणच, धर्माबाद आणि बिलोली नगरपालिका निवडणुकांचे निकाल हे भाजपासाठी केवळ निवडणूक पराभव किंवा विजयापुरते मर्यादित न राहता, अंतर्गत समन्वयाचा अभाव, नेतृत्वातील मतभेद आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाचा प्रश्न निर्माण करणारे ठरले आहेत. आता या सर्व प्रश्नांना भाजपाचे जिल्हा व राज्य नेतृत्व काय उत्तर देते, आणि मूळ कार्यकर्त्यांच्या भावना कशा प्रकारे सांभाळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



