बिट जमादार वसूलीत मग्न : नरसीतून चोरट्यांनी हँडल लाँक तोडून दुचाकी पळवली

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : चक्क चोरट्यांनी रस्त्यावर उभे असलेल्या एका वासराची कारमध्ये कोंबून चोरी करण्यात आल्याची घटना ताजी असतांनाच काल नरसी येथून एक मोटरसायकचा हँडल लाँक तोडून चोरट्यांनी मोटारसायकल पळवल्याची घटना घडली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कँमेऱ्यात कैद झाली असल्याने नरसी परिसरात चोरटे सक्रीय असल्याचे दिसून येते. मात्र स्थानिक बिट जमादार काय फक्त हप्ते वसूली करण्यासाठीच आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नायगाव तालुक्यातील नरसी हे महत्वाचे गाव असून येथे चौरस्ता असल्याने तेलंगणा, आंध्र व कर्नाटकात वाहणे जातात. त्यामुळे रामतीर्थ येथे पोलीस ठाणे असून नरसी येथे पोलीस चौकी आहे. नरसीची परिस्थिती पाहता अधिकाऱ्यांचा वावर हा नरसीतच असतो आणि पोलीस कर्मचाऱ्यांचीही संख्या नरसीतच असते. त्याचबरोबर नरसी ग्रामपंचायतने चौकात सी सी टीव्ही कँमेरेही बसवले आहेत. असे असतांनाही नरसीत चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. चार मार्गावरून नरसी बसस्थानकात बसेसची ये जा असते त्यांनी तेथे नेहमीच चोरीच्या घटना घडतात.
मागच्या काही महिण्यात अनेक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रासह अनेक प्रकारच्या दागिण्याच्या चोरी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यातील अनेकजण तक्रार देण्यासाठी नरसीच्या चौकीत येतात परंतु स्थानिक बिट जमादार सोनकांबळे हे तक्रार देण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्यात जाण्याचे आदेश देतात नाही तर तक्रारदारालाच दमदाटी करुन पळवून लावतात त्यामुळे या चोरीच्या घटनांची नोंदच होत नाही.
रामतीर्थ पोलीस चोरीसह इतर घटनांची नोंदच घेत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले असून आठ दिवसापूर्वी बिलोली रोडवर चोरट्यांनी रस्तरावर उभ्या असलेल्या गायीच्या वासराला चक्क कारमध्ये कोंबून चोरी केल्याची आणि पोटच्या गोळ्याला कारमध्ये कोंबून नेत असतांना आईची झालेली घालमेल सीसी टिव्ही फुटेजमधून व्हायरल झालेली असतांना रामतीर्थ पोलीसांच्या ह्रदयाला पाझर फुटला नाही. कारण वासराला चोरणाऱ्या चोरट्यांचा आजपर्यंत थांगपत्ता लागला नाही. विशेष म्हणजे रामतीर्थ येथे एकाच एटीएममधून दोन वेळा चोरी झाली त्याचाही आजपर्यंत तपास लावण्यात रामतीर्थ पोलीसांना यश आले नाही.
रामतीर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी काही घटनेची नोंदच घेत नाहीत घेतले तर त्या घटनेचा तपासच करत नाहीत. त्यामुळे चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. पोलीस यंत्रणा सुस्त असल्याने दि. ३१ जानेवारी रोजी पहाटे अविनाश डाकोरे यांची एम एच २६, सी आर ५६५० या क्रमांकाची पल्सर २२० मोटरसायकल चोरट्यांनी पळवली. विशेष म्हणजे तोंडावर फडके बांधून आलेल्या तीन चोरट्यांनी मोटारसायकलचे हँडल लाँक तोडले. सुरुवातीला हँडल लाँक लवकर तुटले नाही पण प्रयत्न करुन हँडल लाँक तोडले. त्यानंतर मागच्या टायरला काहीतरी करुन मोटरसायकल थोड्या दुर अंतरावर नेवून देगलूर रोडवर घेवून गेले. इथपर्यंतचा चोरट्यांचा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
रामतीर्थ पोलीसांची आजपर्यंतची दमदार कामगिरी पाहता मोटारसायकल मालकाने याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांना कळवले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हीच मोटारसायकल यापूर्वी चोरीला गेली होती नंतर ती हैदराबाद येथे सापडली. त्यानंतर दुरुस्त करुन घेतली पण पुन्हा दि. ३१ जानेवारीच्या पहाटे चोरीला गेली आहे.



