सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे नरसीतील गो- तस्करीचा पर्दाफाश… आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
हृदयद्रावक घटनेनंतर एलसीबीची धडक कारवाई ;तिन आरोपींसह एकूण नऊ जणांच्या मुसक्या आवळल्या, XUV वाहन जप्त

सय्यद जाफर
नायगांव :- नरसी–बिलोली मार्गावरील एका अमानवी आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. सीसीटीव्हीच्या अचूक फुटेजच्या आधारे नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने गो – तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिन मुख्य आरोपींसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले XUV चारचाकी वाहनही स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या तीन आरोपींना रामतीर्थ पोलिसांनी स्वातंत्र केल्यानंतर त्यांना नायगांवच्या न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०५:२२ वाजता पोलीस स्टेशन रामतीर्थ हद्दीतील नरसी ते बिलोली मार्गावर, मध्यवर्ती बँकेसमोर रस्त्याच्या दुभाजकावर बसलेल्या गाय व वासराला लक्ष्य करून वासराची जबरदस्तीने चोरी करण्यात आली. वासराला गाडीत टाकल्यानंतर आई गाय आपल्या पिल्लासाठी विव्हळत त्या वाहनाभोवती फिरत असल्याचे अत्यंत केविलवाणे दृश्य तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जनतेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे गुन्हा रजिस्टर नंबर १०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. महामार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गो-तस्करी व चोरी करणाऱ्या या टोळीवर धडक कारवाई करत तिन आरोपींसह एकूण नऊ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद अजीम मोहम्मद सिराज, रा.पाकीजानगर, नांदेड शेख आश्रफ पिता शकेल, रा.मनोर, ता.मनोर, जि. पालघर (ह.मु.लेबर कॉलनी, नांदेड) कय्युम आयुबखान, रा.मुंब्रा, जि.ठाणे (ह.मु.लेबर कॉलनी, नांदेड) यांचा समावेश आहे.
सदर आरोपींना रामतीर्थ पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर नायगांव येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले XUV चारचाकी वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वासराच्या चोरीनंतर आई गाईच्या विव्हळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरसी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पशुप्रेमींनी वारंवार पोलिस प्रशासनाकडे आरोपींना अटक करण्याची मागणी लावून धरली होती.
अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे जनतेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या अचूक वापरातून गुन्हेगारांपर्यंत पोहोचलेली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेचे, कार्यक्षमतेचे व तांत्रिक कौशल्याचे कौतुकास्पद उदाहरण ठरत आहे.
‘श्रेयवाद’ की सत्य …?
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आले. मात्र, समाजमाध्यमांवर व जनतेत वेगळ्या चर्चेला उधाण आणण्याच्या उद्देशाने रामतीर्थ पोलिसांनी ही कारवाई आम्हीच केल्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात गुन्हा घडलेले ठिकाण नरसी असले तरी त्याचा सखोल तपास रामतीर्थ पोलिसांनी केलेला नसल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, पोहेकाॅ रविशंकर बामणे, चंद्रकांत स्वामी, शेख अझरोद्दीन, अनिल बिरादार, शेख उमर, प्रदीप जोंधळे, चालक सुधाकर देवकते, सायबर सेलचे राजू सिटीकर व दिलीप ओढणे यांनी तांत्रिक व गोपनीय तपास करत या मोठ्या गो-तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या.



