गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

नरसी येथील हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या १६ लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : तालुक्यातील नरसी येथे जुन्या कारणावरून दोन माजी सरपंचाच्या कुटूंबात (दि.१२) रोजी सकाळी तुंबळ हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्याचा मुक्त वापर झाल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले. सर्व गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उशिरा दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारीवरुन १६ लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नायगाव तालुक्यातील नरसी हे गाव चौरस्त्याचे गाव म्हणून ओळख आहे पण मागच्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायतच्या राजकारणावरुन वातावरण चांगलेच पेटत गेले. विशेषतः मागच्या पाच वर्षात या वादाने हिंसक वळण घेतले त्यामुळे तेथे भिलवंडे विरुद्ध भिलवंडे असाच वाद वाढून अनेकदा भडका उडाला आहे. ग्रामपंचायतचे राजकारण दोन्ही भिलवंडे यांच्या घरापर्यंत गेल्यामुळे सत्तासंघर्षला हिंसक वळण लागले. याच कारणावरून दोन गटात मारहाण व वाद झाले असून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झालेले आहेत.

नरसी शहरातील शाम नगर भागात पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून बुधवारी वातावरण तणावपूर्ण बनले होते परंतु गुरुवारी सकाळी ११ च्या दरम्यान रस्त्यातच पांडुरंग हार्डवेअर समोर झालेल्या बाचाबाचीतून क्षणात प्रकरण हातघाईवर आले आणि दोन गटात नरसीच्या चौकातच तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांनी एकदुसऱ्यावर तुफान हल्ला चढवला यात लोखंडी राडसह कोयत्याचा व लाठ्याकाठ्याचा मुक्तपणे वापर करण्यात आल्याने अनेकजन गंभीर जखमी झाले.

ज्या ठिकाणी ही हाणामारी झाली त्या ठिकाणी रक्ताचा सडा दिसून आला. चक्क रस्त्यावरच हाणामारी सुरु असल्याने प्रचंड गर्दी जमली होती. गर्दीतील नागरिकांनी भांडणे सोडवण्याऐवजी व्हिडीओ करतांना दिसले. यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी धावत येवून भांडणे मिटवण्याचा प्रयत्न करत असतांनाही एकदुसऱ्यावर हल्ला करणे सुरुच होते.

या तुंबळ हाणामारीत दोन्ही भिलवंडे गटातील अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हाणामारीनंतर नरसीत तणावाची परिस्थिती असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणी रवींद्र शिवाजीराव भिलवंडे यांच्या तक्रारीवरुन ९ लोकांच्या तर गजेंद्र पांडुरंग भिलवंडे यांच्या फिर्यादीवरून ६ लोकांच्या विरोधात रामतीर्थ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

नरसी येथील भिलवंडे परिवार म्हणजे राजकीय व सामाजिक ऐक्याचे एका काळात आदर्श उदाहरण होते. कारण सर्वच पक्षात भिलवंडे यांचे वर्चस्व राहीलेले होते. वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतांनाही ते गावच्या कोणत्याही निवडणुकीत एकत्र येवून विरोधकांचा सफाया करत होते. मात्र ग्रामपंचायतच्या राजकारणावरुन भिलवंडे एकदुसऱ्याचे विरोधक तर झालेच पण या सत्तासंघर्षाला रक्तरंजीत वळण लागल्याने याची जनमानसात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker