डॉ.अंबिका लाठकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न नागरी पुरस्कार प्रदान

शेषेराव कंधारे
नायगाव :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र तर्फे नवांकुर क्लिनिकच्या प्रमुख डॉ.अंबिका मारूती लाठकर यांना नुकताच राज्यस्तरीय आरोग्यरत्न नागरी पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. स्त्रीरोग, पंचकर्म व वंध्यत्व निवारण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला. डॉ.लाठकर यांनी आतापर्यंत ७५० पेक्षा अधिक दाम्पत्यांना उपचारांद्वारे माता-पिता होण्याचा आनंद मिळवून दिला आहे. तसेच जिल्ह्यातील हजारो महिलांच्या आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे, योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि वेळेवर उपचार उपलब्ध करून देणे या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबांच्या आयुष्यात नवसंजीवनी निर्माण केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बारूळच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठीही त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने “नवअंकुर” फुलले असून आरोग्याबाबत सजगता वाढली आहे.
संवेदनशील, अभ्यासू आणि समर्पित नेतृत्व ही डॉ.लाठकर यांची खास ओळख आहे. रुग्णांशी आत्मीयतेने संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करण्याची त्यांची कार्यशैली विशेष कौतुकास्पद मानली जाते. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचा पाठिंबा, समाजाचे प्रेम आणि स्वतःची अथक मेहनत यांचा मोठा वाटा आहे. या मानाच्या पुरस्काराबद्दल डॉ.अंबिका लाठकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.



