ताज्या बातम्यानांदेडनायगांव

टेंभुर्णीत किरकोळ कारणावरून २९ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून – दोन आरोपी अटक

शेषेराव कंधारे

नायगाव :- टेंभुर्णी ता. नायगाव येथे किरकोळ कारणावरून २९ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सतीश ऊर्फ गणेश किशनराव वडजे या तरुणाच्या डोक्यावर भला मोठा दगड घालून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवार दि. १० मार्च रोजी पहाटे सहा वाजताच्या सुमारास समोर आली असून नायगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

टेंभुर्णी येथे गेल्या दोन दिवसांपासून शहावली दर्गा परिसरात यात्रा सुरू होती. दि. १० मार्च रोजी रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास गणेश ऊर्फ सतीश किशन वडजे याचा पप्पू ऊर्फ जेजेराव सटवा सुताडे व त्याचा भाऊ श्याम सुताडे यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. काही नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला आणि गणेश ऊर्फ संतोष यास रात्री अडीच वाजता घरी सोडले.

मात्र गणेश ऊर्फ सतीश वडजे हा पुन्हा रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. त्याच वेळी आरोपी पप्पू ऊर्फ जेजेराव सटवा सुताडे (वय ३१) व त्याचा भाऊ श्याम सुताडे यांनी त्याच्यावर हल्ला करून डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या केली.

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गावात तरुणाचा खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच आयपीएस अधिकारी तथा नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशांत गौडा हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

या प्रकरणी मयताचे वडील किशन आबाजी वडजे (वय ६६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पप्पू ऊर्फ जेजेराव सटवा सुताडे व श्याम सुताडे या दोघांविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.जी.पोमनाळकर करीत आहेत.

नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून गुटखा, मटका, अवैध दारू विक्री, चोरी, तसेच भर चौकात होणाऱ्या मारामाऱ्या आणि खुनाच्या ही घटना होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावांतील यात्रांमध्येही अवैध गुढगुढीचे व्यवसाय सुरू असल्याच्या चर्चा रंगत असून पोलीस प्रशासनाची वचक कमी झाल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.

अशा परिस्थितीत नुकतेच रुजू झालेले आयपीएस अधिकारी तथा नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शशांत गौडा हे वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालून कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात आणतील का याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker