कृष्णूर एमआयडीसीत हेलिप्लांट उद्योगाची मोठी संधी ; आमदार राजेश पवार यांची एमआयडीसी अधिकाऱ्यांशी चर्चा

भगवान शेवाळे
बरबडा : नांदेड जिल्ह्यासाठी भविष्यात मोठी औद्योगिक संधी निर्माण होणार असून कुृष्णूर औद्योगिक वसाहतीत हेलिप्लांट उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या संदर्भात आमदार राजेश पवार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शनिवारी सविस्तर चर्चा केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आणि रिटाव्हिया प्रा.लि. या कंपनीमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार नांदेड जिल्ह्यात सुमारे ४२५० कोटी रुपयांची हेलिप्लांट फॅक्टरी उभारली जाणार आहे. या प्रकल्पामध्ये हेलिकॉप्टरचे सुटे भाग तयार करणे, दुरुस्ती-देखभाल तसेच अभियांत्रिकी सेवा यांचा समावेश असणार आहे.
हा भव्य प्रकल्प उभारल्यास नांदेड जिल्ह्यात २००० हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या संदर्भात शनिवार, १४ मार्च रोजी एमआयडीसीच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत कुृष्णूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि पायाभूत विकासाबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान सौ.पुनम पवार देखील उपस्थित होत्या.
कुृष्णूर औद्योगिक वसाहत ही नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला नवे बळ मिळेल तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये अशाच प्रकारचे मोठमोठे व नवनवे उद्योग कृष्णूर एमआयडीसी मध्ये आणण्याकरता पाठपुरावा करू असा विश्वास आमदार राजेश पवार यांनी व्यक्त केला.



