गावाकडच्या बातम्यानांदेडमुदखेड

जिद्द आणि मेहनतीचा विजय: चिलपिंपरीच्या परमेश्वर सूर्यवंशी यांची धाराशिव पोलीस दलात निवड

राहुल कोलते

मुदखेड : -परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि आईचे अपार कष्ट यांच्या जोरावर मुदखेड तालुक्यातील चिलपिंपरी येथील परमेश्वर दिगंबर सूर्यवंशी यांनी यशाला गवसणी घातली आहे. नुकतीच त्यांची धाराशिव पोलीस दलात पोलीस पदी निवड झाली असून, त्यांच्या या यशाने परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

वडिलांचे छत्र हरपले, पण आईने कष्टाचा डोंगर पेलला

​परमेश्वर यांचे बालपण अत्यंत संघर्षात गेले. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र, खचून न जाता त्यांच्या आई लक्ष्मीबाई दिगंबर सूर्यवंशी यांनी शेतात मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवण्याचा निश्चय केला. “मी कितीही कष्ट सोसेल, पण माझ्या मुलांना अधिकारी बनवणारच,” ही जिद्द उराशी बाळगून त्यांनी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार केले आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

जिद्द आणि चिकाटीचे फळ

​परमेश्वर हे लहानपणापासूनच मेहनती आणि अभ्यासू वृत्तीचे विद्यार्थी आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिलपिंपरी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यशाचे श्रेय आई आणि गुरुजनांना

​आपल्या यशाबद्दल बोलताना परमेश्वर सूर्यवंशी म्हणाले, “माझ्या या यशाचे संपूर्ण श्रेय मी माझी आई, माझे मामा आणि आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक गुरुला समर्पित करतो. आईच्या कष्टाची आणि मार्गदर्शकांची साथ नसती तर इथपर्यंत पोहोचणे शक्य झाले नसते.”

तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास

​परमेश्वर यांचा हा थक्क करणारा प्रवास ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी नवी दिशा देणारा ठरेल. नव्या जिद्दीने आणि जनसेवेच्या ध्येयाने पोलीस दलात दाखल झालेल्या या परमेश्वर वर सर्व स्तरांतून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker