रामतीर्थ पोलिसांचा जुगाराला लगाम ; ‘गुडगुडी’ बंद झाल्याने यात्रांचा उत्साह द्विगुणित

मनोहर मोरे
किनाळा : -कोणत्याही देवाची यात्रा म्हटली की, तिथे ‘गुडगुडी’ नावाचा जुगाराचा खेळ ठरलेला असायचा. मात्र, रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सपोनी विक्रम हराळे यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे यावर्षी यात्रांमधील हा जुगार पूर्णपणे बंद झाला आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकांची आर्थिक लूट थांबली असून, परिसरात यात्रा भक्तीमय आणि शांततेत पार पडत आहेत.
रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या किनाळा, रामतीर्थ, डोणगाव आणि इतर गावांमध्ये दरवर्षी मोठ्या यात्रा भरतात. या यात्रांमध्ये गुडगुडी खेळवणारे लोक यात्रा कमिटीला विश्वासात घेऊन जुगाराचे फड मांडत असत. यामुळे अनेक भाविक आपले पैसे गमावून निराश होऊन घरी परतत. ही परिस्थिती ओळखून सपोनी विक्रम हराळे यांनी स्पष्ट आदेश दिले की, कोणत्याही परिस्थितीत यात्रेत गुडगुडी चालू देणार नाही. जो कोणी असा प्रयत्न करेल, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
या निर्णयाचा सकारात्मक परिणाम नुकत्याच झालेल्या किनाळा येथील महादेव मंदिर यात्रेत दिसून आला. यात्रेत जुगार नसल्याने भाविकांनी तो पैसा आपल्या मुलाबाळांच्या आनंदासाठी आणि खरेदीसाठी खर्च केला. विशेष म्हणजे, वाचलेल्या पैशातून भाविकांनी मंदिरासाठी सुमारे १ लाख रुपयांची देणगी स्वेच्छेने दिली.
”पोलिसांच्या निर्णायक भूमिकेमुळे यावर्षी यात्रा निर्विघ्नपणे पार पडली. भाविकांनी जुगारात पैसे न घालवता मंदिराला सढळ हाताने मदत केली.”
बालाजी पाटील भोसले (उपसरपंच, किनाळा)
यात्रा काळात गुडगुडी चालवण्यासाठी पोलिसांना लाखो रुपयांचे आमिष दाखवले जाते, असा शिरस्ता आहे. परंतु, सपोनी विक्रम हराळे यांनी अशा प्रलोभनांना बळी न पडता जनहिताला प्राधान्य दिले. त्यांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“लाखो रुपयांच्या प्रलोभनाला लाथ मारून गुडगुडी बंद करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. यात्रा खऱ्या अर्थाने उत्साहात पार पडण्याचे श्रेय रामतीर्थ पोलिसांना जाते.” श.मा.डोणगावकर (माजी प्राचार्य, डोणगाव)



