रामतीर्थ पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार चौघाजना विरुद्ध गुन्हा दाखल

मोरे मनोहर
किनाळा :- केरूर तालुका बिलोली येथील रामा नारायण आरोटे वय वर्ष 55 यांच्या घरात चोरी केल्याच्या संशयावरून थंडगार पाण्यात बुडवून तांदूळ टाकलेले नागेलीचे पानाचे विडा खाण्यास दिल्याने शरीराला व मनाला वेदना झाल्या याप्रकरणी परमेश्वर कंठीराम राठोड राहणार केरूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिनांक 11 ऑगस्ट रोजी चौघा जनाविरुद्ध महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की केरूर तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील रामा नारायण आरोटे वय वर्ष 55 यांच्या घरात दिनांक 19 जुलै रोजी चोरी झाल्याने रामा आरोटे यांनी यासंबंधी पोलिसात माहिती न देता चोराचा शोध घेण्यासाठी त्यांनी चक्क भोंदू बाबा ची मदत घेण्यासाठी जारीकोट तालुका धर्माबाद येथील भोंदूबाबा गंगाराम संका यांच्याकडे गेल्याने सदरील भोंदूबाबांनी थंडगार पाण्यात बुडवून तांदूळ टाकलेले नागेलीचे पानाचे विडे रामा आरोटे यांच्या कडे देत त्यांना तुमचा तुमच्या घरात चोरी केल्याचा ज्याच्यावर संशय आहे त्यांना हे विडे खाण्यास द्याअसे सांगितल्याने रामा आरोटे यांनी भोंदू बाबांनी दिलेले पानाचे विडे गावातील परमेश्वर कंठीराम राठोड यांना खाण्यास दिले असल्याने परमेश्वर यांच्या शरीराला व मनाला वेदना झाल्या.
चोरीचा संशय घेऊन शरीराला व मनाला वेदना दिल्याप्रकरणी परमेश्वर कांतीराम राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुरन 254/ 2025 कलम 13 महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायदा प्रमाणे भोंदू बाबा गंगाराम संका कादरी राहणार जारिकोट यांच्यासह रामा नारायण आरोटे वय 55, गंगाधर रामा आरोटे वय 30, राजू नारायण आरोटे वय 40 राहणार केरूर या चौघा जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार काळे हे करत आहेत.
केरूर येथील रामा आरोटे यांच्या घरात भोंदू बाबाच्या सांगण्यावरून गावातील परमेश्वर राठोड यांनी चोरी केल्याचे संशय घेतल्याने गावात दोन समाजात चांगलाच वाद निर्माण झाला होता मात्र हा वाद रामतीर्थ पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला.



