रामतीर्थ पोलीसांचा अफलातून कारभार : फिर्यादीने आरोपी पकडून दिला तरी अटक होईना
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नरसी येथील गंगाबाई बालाजी बोंधरे यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरु शेळ्या चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणातील एक आरोपी फिर्यादीनेच पोलिसांना सापडून दिला. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीने तिघांनी शेळ्या चोरल्याचे सांगितले. यानंतर रामतीर्थ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीसह अन्य दोघांना अटक करुन चोरलेल्या शेळ्या जप्त करण्याऐवजी त्यांना मोकाट सोडले. आजपर्यंत आरोपींना अटक केली नाही. आरोपींना अटक का करण्यात येत नाही अशी विचारणा करणाऱ्या फिर्यादीलाच दमदाटी करण्यात येत आहे.
नरसी येथील गंगाबाई बालाजी बोंधरे यांचे पती बालाजी बोंधरे यांनी शेळ्या पाळल्या होत्या त्यांच्याकडे एकूण 30 शेळ्या होत्या आणि त्यांनी अनिल व्यंकटराव बोधने यांचे शेतातील जागलीवर मागील पाच वर्षापासुन शेळया बांधत असत. दररोजच्या प्रमाणे दि. 3 नोव्हेंबर रोजी शेळ्या बांधून ते जेवन करुन झोपले होते. मात्र रात्री दोन वाजता शेळ्या बांधलेल्या जागेवर गेले असता बांधलेल्या शेळ्यापैकी 20 मोठ्या व 6 पिल्ले दिसून आले नाहीत. चोरी गेलेल्या शेळ्यांचा शोध घेतला असता रोहीतदास लक्ष्मण बोंद्रे, नरसी, साईनाथ लक्ष्मण बोंद्रे नरसी व हनमंत लक्ष्मण बिजले रा. जळकोट यांनी 2 लाख 50 हजाराच्या शेळ्या चोरल्याची तक्रार गंगाबाई बालाजी बोंधरे यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात दि. 5 नोव्हेंबर रोजी दिली.
या प्रकरणातील एक आरोपी रोहीतदास लक्ष्मण बोंद्रे, नरसी, यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता माझ्यासह साईनाथ बोंद्रे व हनमंत बिजले यांनी संगणमताने चोरी केल्याचे कबूल केले. शेळ्या चोरल्याचे आरोपीने कबूल केल्यानंतर सर्व आरोपींना ताब्यात घेवून चोरी गेलेल्या शेळ्या जप्त करणे गरजेचे असताना रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप हे आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत. सदर प्रकरणी तक्रारदार महिला गंगाबाई बालाजी बोंधरे यांनी अनेकवेळा जगताप यांची भेट घेवून आरोपींना अटक करावी व चोरी गेलेल्या शेळ्या परत मिळवून देण्याची विनंती करत आहे पण रामतीर्थ पोलिसांना काहीही फरक पडत नाही.
शेळ्या चोरी प्रकरणात आरोपी निष्पन्न झाले चोरट्यांनी कबूली दिली तरीही रामतीर्थ पोलीस चालढकल करत आहेत. अनेक वेळा विनंती केल्यानतरही रामतीर्थचे अधिकारी तक्रारदार महिलेलाच दमदाटी करत आहेत. रामतीर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी मस्तवालपणे तर वागतच आहेत पण गुन्हे दडपणे, एकापेक्षा जास्त आरोपी असतांना आर्थिक तडजोडी करुन एकच आरोपी दाखवणे, अपघाताच्या प्रकरणात वाहणासह चालकही बदलणे असे प्रकार करत असल्याचा आरोप होत आहे.