खाजगी शाळांना दणका: ठराविक दुकानातून गणवेश आणि शैक्षणिक साहित्य घेण्याची सक्ती केल्यास होणार कारवाई

प्रकाश महिपाळे
पुणे: राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करू नये, असे कडक आदेश महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले असून, पालकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
अनेक खाजगी शाळा व्यवस्थापनांकडून पालकांना ठराविक विक्रेत्यांकडूनच महागडे गणवेश, स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्य घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी एकत्रित परिपत्रक काढून सर्व शाळांना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे:
- सक्तीवर बंदी: कोणत्याही शाळेला पालकांवर विशिष्ट दुकानातून गणवेश किंवा साहित्य खरेदी करण्यासाठी दबाव टाकता येणार नाही.
- पुस्तकांबाबत स्पष्ट सूचना: राज्य मंडळ (SSC), C.B.S.E. आणि I.C.S.E. मंडळाच्या शाळांनी केवळ NCERT किंवा SCERT (बालभारती) द्वारे प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तकेच वापरणे बंधनकारक आहे.
- खाजगी प्रकाशनांना चाप: खाजगी प्रकाशनांची महागडी पुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांना किंवा पालकांवर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
- कारवाईचा इशारा: जर एखाद्या शाळेने नियमांचे उल्लंघन केले आणि त्याबाबत शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकाऱ्यांकडे तक्रार प्राप्त झाली, तर त्याची शहानिशा करून संबंधित शाळेवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
पालकांना आवाहन
शाळांकडून अशा प्रकारची कोणतीही सक्ती होत असल्यास पालकांनी स्थानिक शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे रितसर तक्रार करावी, जेणेकरून दोषी शाळांवर प्रशासकीय बडगा उगारला जाईल.



